औरंगाबाद जिल्ह्यात महिलेला जाळण्याच्या गुन्ह्याचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येईल. त्यासाठी विशेष वकिलाची नेमणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना दिली.

वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये शिक्षिकेला जिवंत जाळल्याची घटना ताजी असतानाच औरंगाबाद जिल्ह्यातल्या अंधारी गाव येथे एका ५० वर्षीय महिलेला बिअरबार चालकाने घरात घुसून जाळल्याची घटना घडली. या घटनेबाबत बोलताना मंत्री पाटील म्हणाले की, पीडित महिला व युवतीच्या बाबतीत घडलेली घटना पाहता काहीजण जाणीवपूर्वक महिलांना लक्ष्य करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसते. अशाप्रकारे कोणीही काही करण्याचा प्रयत्नात असल्याचा सुगावा लागल्यास संबंधितांनी पोलीसांशी संपर्क साधावा. ज्यामुळे उचित कारवाई करता येणे शक्य होणार आहे.

महाराष्ट्रातही ‘दिशा कायदा’ –
औरंगाबादेतील घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल. तसेच, आंध्रप्रदेश प्रमाणे महिलांबाबत घडणाऱ्या गंभीर गुन्ह्याचा निकाल १४ दिवसांत देणारा ‘दिशा कायदा’ देखील राबवला जाणार आहे. यामुळे अशा घटनांना प्रतिबंध लागून गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा लवकर होऊ शकेल, असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला.