शेती घेण्यासाठी माहेरुन पैसे आण असा तगादा सासरच्यांनी लावल्याने या छळाला कंटाळून कोपरगाव येथे एका विवाहितेने आत्महत्या केली. सोनाली शिंदे असे या महिलेचे नाव असून या प्रकरणी महिलेचा पती, दीर, सासू आणि सासरे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि हुंड्यासाठी छळ करणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोकमठाण येथे राहणाऱ्या सोनाली शिंदे या तरुणीचा चार वर्षांपूर्वी मच्छिंद्र शिंदे याच्याशी विवाह झाला. लग्नाच्या काही दिवसानंतर सोनालीचा सासरच्यांकडून छळ सुरु झाला. शेती घेण्यासाठी तू माहेरून ५ लाख रुपये घेऊन ये तरच या घरात रहा, असे म्हणून तिला सातत्याने मारहाण करत व तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून सोनालीने विषप्राशन करुन आत्महत्या केली. या प्रकरणी सोनालीची आई अलका बाळासाहेब पवार हिने कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. नवरा मच्छिंद्र, दीर दत्तू, सासू कडूबाई, सासरा अहिलाजी या चौघांनी केलेल्या छळाला कंटाळून सोनालीने आत्महत्या केल्याचे त्यांनी म्हटले आहे.