देवसूच्या सरपंच पूजा मेस्त्री यांना शेतमांगर बांधण्याकरिता परवानगी दिली नाही म्हणून डांबून ठेवल्या प्रकरणातील आरोपी माजी सरपंच व माजी सैनिक भिकाजी सावंत याला न्यायाधीश खालीद भेंडवडे यांनी शनिवारी दोन गुन्ह्य़ात दहा हजार रुपयांचा दंड आणि तीन वर्षांची साधी कैदेची शिक्षा ठोठावली.
माजी सरपंच व माजी सैनिक भिकाजी सावंत याने एकूण दहा हजार रुपयांचा दंडाची रक्कम न्यायालयात जमा करीत शिक्षेविरोधात अपील करण्याची संधी न्यायालयाने द्यावी, अशी विनंती केल्यावर त्याची सुटका करण्यात आली.
आरोपी भिकाजी सावंत याला भा. दं. वि. कलम ५०४ अन्वये निर्दोष मुक्त करतानाच भादंवी कलम ३४२ अन्वये दोन महिने साधा कारावास, पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना कारावास तर भा. दं. वि. कलम ५०६ अन्वये एक महिना कारावास, पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना कारावास अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप वेडे यांनी तपास केला होता.
या प्रकरणात आरोपी भिकाजी सावंत याच्याकडून न्यायालयात दोन गुन्ह्य़ात शिक्षा झाल्याने दहा हजार दंड करण्यात आला. या दंडापैकी पाच हजार रुपये फिर्यादी पूजा मेस्त्री यांना तर उर्वरित रक्कम सरकारजमा करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला.
याबाबत हकीकत अशी की, देवसू ग्रामपंचायतीत सरपंच पूजा बाळाजी मेस्त्री आपल्या केबिनमध्ये बसल्या असताना ३० मे २०१५ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आरोपी भिकाजी सावंत आला. आपल्या शेतमांगराला परवानगी दिली नाही, असे तावातावाने बोलू लागला. या वेळी माजी सरपंच असणाऱ्या सावंतांनी हंगामादेखील केला. महिला सरपंच पूजा मेस्त्री सारे ऐकत असतानाच दरवाजाला बाहेरून कडी घालून कोंडून ठेवण्याचा गैरप्रकार आरोपी सावंत याने केला. महिला सरपंचास कोंडून ठेवत सरपंच व तिचा नवरा बाळाजी मेस्त्री यांना ठार मारण्याची धमकी व शिवीगाळदेखील केली. या प्रकरणी सावंतवाडी पोलिसांना पाचारण करण्यात आले.
कोंडून ठेवल्याप्रकरणी रीतसर फिर्याद महिला सरपंचांनी दाखल केल्यावर भा. दं. वि. कलम ३४२, ५०४ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करून न्यायालयात खटला सुरू होता. न्यायाधीश खालीद भेंडवडे यांनी भादंवी कलम ३४२ व ५०६ अन्वये भिकाजी सावंत याला दोषी ठरवत शिक्षा ठोठावली.