तासगाव तालुक्यातील विसापूर येथे बुधवारी दुपारी वीज पडून ऊस तोडणीसाठी उघडय़ावर राहुटीत राहणा-या एका महिलेचा मृत्यू झाला.  जोरदार वादळ, वा-यासह जिल्ह्याच्या काही भागात मध्यम पावसाने हजेरी लावली.  तासगाव तालुक्यात मात्र पावसाबरोबरच गारपीटही झाली.
अनिता बाबासाहेब आवळे (वय ३३, रा. गोमेवाडी, ता. आटपाडी) ही महिला आपल्या कुटुंबासोबत ऊस तोडणीसाठी तासगाव तालुक्यातील विसापूर येथे वास्तव्यास होती.  विसापूर येथील ज्योतिर्लिंग मंदिराजवळ उसाच्या पाल्यापासून केलेल्या राहुटीत ती राहण्यास होती. आज दुपारी राहुटीवर वीज कोसळल्याने ती जागीच ठार झाली.  तिच्या सोबत असणारे म्हशीचे रेडकूही जागीच ठार झाले.  या बाबत तासगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मयताची नोंद झाली आहे.
आज दुपारपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.  सांगली, मिरज परिसरात ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.  तासगाव तालुक्यातील विसापूर, वायफळे परिसरात जोरदार वा-यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.  प्रारंभी काही काळ गारपीटही झाली. मात्र या वेळी पडलेल्या गारा बोरा एवढय़ा असल्याने फारसे नुकसान झाले नाही.