सुविधांचा अभाव; महिलांना तासन्तास रांगेत उभे राहण्याची वेळ

विरार :  राज्य सरकारने महिलांना रेल्वेत प्रवासाची मुभा देऊन महिलांना मोठा दिलासा दिला आहे. पण हाच दिलासादायक प्रवास अवघ्या आठवडाभरात मोठा त्रासदायक वाटू लागला आहे. कारण रेल्वे स्थानकात सुविधांचा अभाव असल्याने महिलांना तासन्तास रांगेत काढावे लागत आहेत.

वसई, विरार, नालासोपारा परिसरांत खासगी कार्यालयात काम करणाऱ्या महिलांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. यामुळे अनेक महिलांच्या कामकाजाच्या वेळा आणि रेल्वेत प्रवास करण्याच्या वेळा यात मोठी तफावत येत असल्याने अनेक कार्यालयांच्या वेळांमध्ये बदल करण्यात केला. परिणामी लोकल प्रवासासाठी स्थानकातील तिकिटांसाठी भल्यामोठय़ा रांगा लागत आहेत. त्यातही केवळ विरारमध्ये एक ते दोनच खिडक्या सुरू असतात, तर नालासोपारा पूर्व-पश्चिम येथील अध्र्याहून अधिक तिकीट खिडक्या बंद आहेत. त्याचबरोबर  स्थानकात असलेले एटीव्हीएम मशीन बंद आहेत. यामुळे तिकीट मिळविण्यासाठी महिलांचा बराच वेळ वाया जात आहे. तसेच अनेक स्थानकांत तिकीट खिडक्यांसमोरील रांगांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे.

कामावर वेळेवर पोहोचण्यासाठी महिलांना पुन्हा रांगेचा सामना करावा लागत आहे.  सकाळपासून काही महिला रेल्वे स्थानक गाठून तिकीट-पास काढण्यासाठी रांगा लावतात.  यामुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.  त्यात दिवाळी सणासाठी खरेदी करण्यासाठी महिला मोठय़ा प्रमाणात बाहेर पडत असल्याने महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे, तर स्थानकात पिण्याच्या पाण्याची सोय, महिला शौचालये यांची नियमित साफसफाई होत नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

आम्हाला कार्यालयाच्या वेळेच्या दोन ते तीन तास आधी येऊन तिकिटांसाठी उभे राहावे लागत आहे. स्थानकात केवळ एक ते दोन खिडक्याच सुरू असतात. यामुळे अनेकदा तिकीट मिळेपर्यंत लोकल निघून जाते व कामावर उशिरा आल्याचा शेरा लागतो.

वनिता दारुळकर, प्रवाशी महिला