यात्रेत चोर समजून पकडलेल्या महिलेची झडती घेण्यास विरोध करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला माजी सैनिक व त्याच्या मुलाने लाथाबुक्कय़ांनी मारहाण केली. नेवासे तालुक्यातील बालाजी देडगाव येथील यात्रेत हा प्रकार घडला.

बालाजी देडगाव येथे कोजागरी पौर्णिमेची यात्रा होती. यात्रेत चोरी करण्याच्या उद्देशाने तीन महिला फिरत असल्याचे यात्रेतील काहींनी पाहिले. तिन्ही महिलांना पकडण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. या घटनेची माहिती यात्रेत बंदोबस्तासाठी असलेले कुकाणे पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी गणेश इथापे यांना देण्यात आली. त्यांनी नेवासे पोलीस ठाण्यात दूरध्वनी करुन मोटार बोलाविली. पकडलेल्या महिलांना अन्यत्र जाण्यास मज्जाव केला. या वेळी पकडलेल्या महिलांकडे गावातील आशिष हिवाळे, प्रमोद थोरात, लक्ष्मण सकट हे चौकशी करत होते. त्या वेळी नरहरी भाऊराव मुंगसे हा तेथे आला. त्याने महिलांची झडती घेण्याचा प्रयत्न केला. त्याला पोलीस कर्मचारी इथापे यांनी विरोध केला. त्याचा राग येऊ न मुंगसे याने पोलीस कर्मचारी इथापे यांना लाथाबुक्कय़ाने मारहाण करुन शिवीगाळ केली. सरकारी कामात अडथळा आणला, म्हणून फिर्याद दाखल के ल्यावर पोलिसांनी मुंगसे याला अटक केली आहे. मुंगसे हा निवृत्त सैनिक असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, नेवासे येथून पोलिसांची मोटार व कर्मचारी आले. गावकऱ्यांनी पकडलेल्या तिन्ही महिलांना ताब्यात घेऊ न नेवासे पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे त्यांची चौकशी करण्यात आली. या महिलांकडे चोरीचा कुठलाही ऐवज आढळून आला नाही. चौकशी करुन त्यांना सोडून देण्यात आले.