गॅरेजवर येणाऱ्या गाड्यांना तिचा हात लागला की गाडी सुसाट धावते. इंजिन कामापासून कोणतंही काम असो, ती ते परफेक्ट करते. त्यात तिचा बाईपणा कुठेच आड येत नाही. अनुराधा फाटक असं या ‘लेडी मेकॅनिक’च नाव. पुरुषांची मत्तेदारी असलेल्या या क्षेत्रात सात वर्षांपासून ती वावरतेय.

सात वर्षांपूर्वी महिला उद्योगाच्या व्याख्या बदलून अनुराधताईनी हे काम का स्वीकारलं. खरं तर त्यामागे एक कारण आहे. त्यांचं मुळ गाव नगर जिल्ह्यातलं. रस्त्याच्या कामात त्यांची शेतजमीन गेली. त्यामुळे पोटापाण्यासाठी त्यांचं कुटुंब औरंगाबादमध्ये वास्तव्याला आलं. त्यांचे पती खासगी कंपनीत काम करत होते. सगळं सुरळीत सुरू होतं. मात्र रक्तदाबाच्या आजाराचं निमित्त झालं. त्यांच्या पतीनं अंथरून धरलं. डॉक्टरांनी मेंदूला सूज आल्याचं सांगितलं. तेव्हापासून अनुराधताईंच्या आयुष्याचा संघर्ष सुरू झाला.

पतीच्या आजारपणात घरातील जमापुंजी संपली. पुढील उपचार आणि घराची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी काम करणं गरजेचं होतं. शिक्षण बारावीपर्यंत झालं असल्यानं छोटी-मोठी नोकरी मिळाली असती. मात्र नोकरी करून घरी हवा तेव्हा वेळ देता येणं शक्य नव्हते. त्यामुळे अनुराधाताईनी काही तरी व्यवसाय करायचं ठरवलं. त्यावेळी अनेक महिलाउद्योग समोर आले. मात्र कुटुंबाची गरज, त्या उद्योगातून मिळणार नफा याचा ताळमेळ लागणं शक्य नव्हते आणि मनात काही वेगळं करण्याची इच्छा होती. त्यातून गॅरेज सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. घरातलं सोनं विकून भांडवल उभारलं आणि सात वर्षांपूर्वी त्यांनी गॅरेज सुरू केलं. तेव्हापासून आतापर्यंत पुरुषाची मत्तेदारी असलेल्या या क्षेत्रात त्या सहज काम करत आहेत.

कामाचा लोड वाढला तसं त्यांनी कामात भाच्याला सोबत घेतलं आहे. दोघे मिळून हे काम करतात. गाड्यांची सर्व्हेसिंग असो की, ऑशिंग ही लेडी मेकॅनिक सगळी कामं करते. आपल्या कामात पतीचं मोठं पाठबळ मिळाल्याचं त्या सांगतात. संसाराचे सातफेरे घेत असताना आपण एकमेकांना सोबत करण्याचं वचन देत असतो. त्यामुळे माझं कर्तव्य मी पूर्ण करत आहे. त्यात वेगळं काही नाही. अस त्या संगतात. या कामातून मिळणाऱ्या मोबदल्यातून अनुराधताई पतीच्या आजारावर उपचार आणि मुलांची शिक्षण पूर्ण करतात. त्यांना दोन मुलं आहेत. मोठा मुलगा वेब डिझायनींगच शिक्षण घेतोय. तर लहान मुलगा अकरावीच्या वर्गात आहे. मुलांनी शिकावं मोठं व्हावं हे त्यांचं स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी कितीही कष्ट करण्याची तयारी असल्याचं त्या सांगतात.