महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या ऑनलाईन दर्शनाला भाविक मोठ्या संख्येने पसंती देऊ लागले आहे. मंदिर समितीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन दर्शनासोबतच विविध धार्मिक विधी आणि उत्सवाची माहिती देण्यात आली आहे. यात शाकंभरी नवरात्र उत्सवाच्या काळात देवस्थान संस्थानच्या वतीने नाटक, संगीत जलसा यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असल्याची खोटी माहिती नमूद करण्यात आली आहे. संकेतस्थळाला भेट देऊन देवीदर्शनासाठी येणार्‍या भाविकांची यामुळे घोर फसवणूक होण्याची संभावना आहे.

तुळजाभवानी मंदिर समितीच्या वतीने मंदिराचे अधिकृत संकेतस्थळ चालविले जाते. या संकेतस्थळाला वर्षभरात लाखो भाविक भेट देत असल्याच्या नोंदी आहेत. संकेतस्थळावर तुळजाभवानी देवीच्या ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था मंदिर समितीच्या वतीने करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर तुळजाभवानी देवीच्या चरणी ऑनलाईन देणगी अर्पण करण्याची सुविधा देखील उपलब्ध करवून देण्यात आली आहे. संकेतस्थळावरील विविध उत्सव, पूजाविधी आणि वार्षिक उत्सवांची माहिती वाचून देवीदर्शनाचे वेळापत्रक ठरविणार्‍या भाविकांच्या संख्येतही आता कमालीची वाढ होत आहे. अश्या वेळी मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळावर साफ खोटी माहिती नोंदवून भाविकांची घोर फसवणूक केली जात आहे.

दरवर्षी तुळजाभवानी देवीचे दोन वार्षिक नवरात्र महोत्सव पार पडतात. त्यातील मुख्य शारदीय नवरात्र उत्सवाला देशभरातून लाखो भाविक जगदंबेच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात. ज्या भाविकांना शारदीय नवरात्र महोत्सवात गर्दीमुळे अथवा अन्य कोणत्या सबबीमुळे येता आले नाही. ते सर्व भाविक शाकंभरी नवरात्र उत्सावच्या कालावधीत तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी प्राधान्याने येण्याचा प्रयत्न करतात. शारदीय नवरात्र कालावधीत जे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात; तेच कार्यक्रम शाकंभरी नवरात्र उत्सव काळात साजरे केले जातात. संकेतस्थळावर मात्र या नवरात्र उत्सवाचे खास वैशिष्ठ्य म्हणून मंदिर संस्थानच्या वतीने नाटक, संगीत जलसा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात, अशी धडधडीत साफ खोटी माहिती लिहिण्यात आली आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमांचे आकर्षक ध्यानात घेऊन या कालावधीत दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची घोर फसवणूक होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे मंदिर संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. असे असताना संकेतस्थळावरील खोटी माहिती तपासून घेण्याची साधी तसदी देखील घेतली जात नसल्याने मोठा संभ्रम निर्माण होत आहे.

मंदिराचा कारभार पाहण्यासाठी मुख्य प्रशासकीय व्यवस्थापक या पदासह अन्य अनेक महत्वाची पदे निर्माण करण्यात आली आहेत. वर्षाला सुमारे 35 कोटी रुपयांच्या घरात वार्षिक उत्पन्न असणार्‍या मंदिराच्या प्रशासनाचा कारभार मागील अनेक वर्षे दहावी शिक्षण असणार्‍या दिलीप नाईकवाडी यांच्या हवाली करण्यात आला होता. सेवानिवृत्तीनंतर पुन्हा नव्याने त्यांना मुदतवाढ देण्यात आली. मागील तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी फेरमुदतवाढीस नकार दिला होता. मात्र अचानक पुन्हा मंदिरासाठी जनसंपर्क अधिकारी हे पद निर्माण करण्यात आले आणि त्याची जबाबदारी पुन्हा नाईकवाडी यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे संकेतस्थळावर भाविकांची फसवणूक करणारा मजकूर प्रकाशित करणारावर नव्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुुंंढे काय कारवाई करतात ? याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.

भाविक आणि कलाकारांचीही फसवणूक-

तुळजापूरनगरी मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी आहे. हा वारसा जतन व्हावा याकरिता 2009 साली शाकंभरी सांस्कृतिक महोत्सवाची सुरूवात झाली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी त्यात हिरिरिने सहभाग घेतला होता. 2011 साली गेडाम यांची बदली झाल्यानंतर हा महोत्सव बंद पडला. तरी देखील संकेतस्थळावर खास आकर्षण म्हणून सांस्कृतिक महोत्सवाचा उल्लेख केला जात असेल तर हा देशभरातील भाविक आणि कलाकारांची फसवणूक आहे. विद्यमान जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांना हा महोत्सव सुरू करावा तसेच तुळजापूर शहरात अद्ययावत सांस्कृतिक सभागृह उभारावे, असे निवेदन आपण दिले असल्याची माहिती ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकांतअप्पा नाडापुडे आणि तुळजाभवानी मंदीर सांस्कृतिक महोत्सव समन्वयक प्रा. संभाजी भोसले यांनी दिली.

चूक दुरूस्त करण्यात येईल-

संकेतस्थळावरील माहिती वाचून देशविदेशातील भाविक यात्रेचे नियोजन करतात. त्याअनुषंगाने संकेतस्थळावरील माहिती अचूक असायला हवी. पूर्वी तसे महोत्सव घेतले जात. त्यामुळे अनावधानाने मजकूर संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आला असेल. भाविकांची फसवणूक अथवा गैरसोय होवू नये याकरिता संकेतस्थळावरील चुकीची माहिती तत्काळ दुरूस्त केली जाईल, असे तुळजाभवानी मंदीर समितीचे विश्वस्त तथा उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांनी सांगितले.