मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी याकुब मेमन याला फाशी दिली जाणार असली तरी ती नागपूर की पुण्यात? याचा घोळ मात्र कायम आहे. कारागृह प्रशासनातील कुणीही अधिकारी यासंदर्भात बोलायला तयार नाहीत. मुंबईत १९९३ मध्ये साखळी बॉम्बस्फोट घडले होते. हे बॉम्ब पेरून ठेवण्यासाठी तरुणांना तयार करणे तसेच बॉम्ब पेरून ठेवल्यानंतर त्यांना विदेशात पळून जाण्यासाठी विमानाची तिकिटे उपलब्ध करून दिल्याचा ठपका ठेवून चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या याकुब मेमन याला मुंबईच्या टाडा न्यायालयाने २००७ मध्ये भारतीय दंड विधानाच्या कलम १२० (ब) अन्वये फाशीची शिक्षा सुनावली. या शिक्षेस याकुबने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले.
उच्च न्यायालयाने त्याची हा याचिका फेटाळून लावली. या निर्णयाविरुद्ध त्याने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. सर्व मार्ग चोखाळल्यानंतर आता त्याच्या फाशीवर शिक्कामोर्तब झाले आहे. याकुब सध्या नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात असल्याने त्याला ३० जुलैला फाशी दिली जाईल, असा आदेश गृह मंत्रालयाने काढला. तो कारागृह अधीक्षकांना पाठविण्यात आला असल्याचे सांगितले जात असले तरी बुधवार दुपापर्यंत तो मिळाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
याकुब मेमन याला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे त्याला फाशी नागपूरला द्यायची की पुण्याला याचा घोळ कायम आहे. नागपूरचे मध्यवर्ती कारागृह ऐतिहासिक आहे.
इंग्रजांच्या काळात १८६४ मध्ये बांधण्यात आलेल्या या कारागृहात तेव्हापासूनच फाशी देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. तेथे २१ जणांना फाशी दिल्याची तसेच १९७३ नंतर येथे फाशी देण्यात आलेली नाही.