मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिलदार मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राला एक चांगलं नेतृत्त्व लाभलं आहे. मात्र देवेंद्र फडणवीस हे आमच्या विदर्भातले असूनही त्यांना सत्तेत नसणं हे सहन होत नाही अशा शब्दांमध्ये महिला आणि बालकल्याण मंत्री  यशोमती ठाकूर यांनी फडणवीसांवर टीका केली आहे. राजस्थानात जे घडतंय त्यावर आता काँग्रेस नेते प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. यशोमती ठाकूर यांनी राजस्थानच्या परिस्थितीवरही भाष्य केलं आहे. टीव्ही नाईन मराठीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

नेमकं काय म्हणाल्या आहेत यशोमती ठाकूर?
“भाजपाला घोडेबाजाराची सवय आहेच. त्यांना पैशांचा उन्माद आहे. कर्नाटकात मी हे अनुभवलंय. हे सगळं राजकीय संस्कृतीच्या विरोधात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिलदार आहेत. शरद पवार आणि सोनिया गांधी आहेत त्यामुळे राज्यात सरकार स्थिर आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीस आमच्या विदर्भातले आहेत. मात्र सत्ता नसलेलं त्यांना सहन होत नाही”

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा उभारला आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये राजकीय भूकंपाची दाट शक्यता आहे. सचिन पायलट भाजपामध्ये जाणार की वेगळा पर्याय निवडणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. अशात आता या सगळ्या परिस्थितीवर यशोमती ठाकूर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाला घोडेबाजाराची सवय आहे असा आरोप त्यांनी केला आहे. सचिन पायलट यांनी ज्योतिरादित्य शिंदेंची भेट घेतली होती. त्यामुळेही राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अशा सगळ्या स्थितीवर भाष्य करताना महाराष्ट्रातली सत्ता स्थिर आहे असं यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत. मात्र हे सांगतानाच त्यांनी उद्धव ठाकरे दिलदार आहेत तर फडणवीसांना सत्ता गेल्याचं सहन होत नाही असंही भाष्य केलं आहे.