दिवसा उष्णतेचा पारा वाढत असल्याने नागरिक घराच्या बाहेर पडणे टाळतात. त्याचप्रमाणे प्राण्यांनाही उन्हाचा त्रास होत असल्याने ते आपल्या घरातून बाहेर पडणे टाळतात. सरपटणारे प्राणीही याला अपवाद नाही. दिवसाचा उन्हाचा कडाका कमी झाल्यावर रात्रीच्यावेळी सरपटणारे प्राणी बिळाबाहेर निघतात. आता या प्राण्यांना बऱ्याचदा रस्ता आणि शेत यातील फरक ओळखणे अवघड जात असावे. अशाच महामार्गावर सरपटत आलेल्या सापाला वाचविण्यासाठी रात्रीच्या वेळी तरुणांनी पुढाकार घेतला. तुळजापुर महामार्गवर रस्त्यावरुन साप जात असल्याचे दिसताच या मुलांनी बुलेट आडवी लावत रास्ता रोको केला.

तरुणांच्या या कृतीमुळे रात्रीच्यावेळी रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांचा वेग कमी झाला आणि सापाचा जीव वाचला. साप रस्ता ओलांडून समोरच्या रस्त्याला गेल्यावर तरुणांनी बुलेट बाजूला करत वाहनांना जागा करून दिली. विशेष म्हणजे या घटनेचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या तरुणांचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

मल्लिकार्जुन पोतदार आणि राहुल हे आपल्या मित्राच्या वाढदिवसाला तुळजापूर महामार्गावरून जात होते, बुलेटच्या उजेडात अचानक समोर सरपटत आलेला साप रस्ता ओलांडताना दिसला, मात्र त्याने काहीतरी गिळल्याने त्याला रस्ता ओलांडताना वेळ लागत होता. याच महामार्गावरून सुसाट ८० ते १०० च्या वेगाने मोटारी जात होत्या. त्यामुळे कोणत्याही मोटारी खाली येऊन सापाचा मृत्यू झाला असता. परंतु याचे भान ठेवून मल्लिकार्जुन पोतदार आणि राहुल या सजग तरुणांनी आपली बुलेट महामार्गावर आडवी लावली आणि वाहने अडवली. सापाला रस्ता ओलांडण्यासाठी बुलेटच्या उजेडाचा उपयोग झाला, दहा मिनिटांनी साप सुखरूप शेतात निघून गेला. त्यामुळे सापाला तरुणांनी जीवदानच दिले असेच म्हणावे लागेल.