X
X

राजकीय वादातून तरुणाचा खून

READ IN APP

फाळके याला उपचारासाठी रात्रीच सांगलीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

सांगली : एक वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये समाजाची मते मिळाली नाहीत या कारणावरून एका तरुणाचा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या जबर मारहाणीत मृत्यू झाला. ही घटना तासगाव तालुक्यातील वायफळे या गावी घडली. या प्रकरणी फरार झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून कराड येथे त्याला पोलिसांनी जेरबंद केले.

या बाबत मिळालेली माहिती अशी, की बुधवारी रात्री वायफळे येथील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी राहुल परशराम फाळके हा तरुण गेला होता. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष राजेश पाटील हाही त्या ठिकाणी होता. गेल्या वर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये समाजाची मते का पडली नाहीत या कारणावरून पाटील यांने फाळके याला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता.

फाळके याला उपचारासाठी रात्रीच सांगलीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. ही बातमी समजताच कार्यकर्त्यांनी आणि फाळके याच्या नातेवाइकांनी सांगलीच्या रुग्णालयात गर्दी केली होती.

या घटनेच्या निषेधार्थ आज वायफळे गावात बंद पाळण्यात आला. खुनी आरोपीस अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता.

मात्र, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आरोपी राजेश पाटील याला कराड  येथून ताब्यात घेतले असल्याचे सांगताच अत्यंत तणावामध्ये वायफळे गावात अंत्यविधी करण्यात आला. अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले असून, अनेक संघटनांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. राष्ट्रवादीनेही या घटनेची दखल घेत राजेश पाटील याची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

 

 

24
X