बरोबर दोन वर्षांपूर्वी राजकीय वैमन्यस्यातून तरुणाचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी आठ आरोपींना सात वष्रे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा बुधवारी न्यायालयाने सुनावली. चंद्रकांत मारुती नाईक, अन्वर आप्पासो कलावंत, आक्काप्पा शांताराम नाईक, सिदगोंडा रानाप्पा िलगाजी ऊर्फ विभुती, दस्तगीर अप्पासो कलावंत, बसाप्पा चंद्रशेखर नाईक, संजय सिदाप्पा नाईक व रवींद्र अप्पा नाईक अशी शिक्षा आरोपींची नावे आहेत. दंडातील निम्मी रक्कम मृत तरुणाच्या आईस देण्यात यावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
कडलगे (ता.गडिहग्लज) येथे विनायक भीमराव कागिलकर हा युवक आई-वडिलांसमवेत राहत होता. तो गावातील लक्ष्मण जाधव यांच्याकडे काम करत होता. डिसेंबर २०१२ मध्ये झालेल्या कडलगे ग्रामपंचायतीच्या पंचवार्षकि निवडणुकीमध्ये विनायकने जाधव यांचा प्रचार केला होता. यामुळे जाधव यांचे विरोधक असलेले चंद्रकांत मारुती नाईक, अन्वर आप्पासो कलावंत, आक्काप्पा शांताराम नाईक, सिदगोंडा रानाप्पा िलगाजी ऊर्फ विभुती, दस्तगीर अप्पासो कलावंत, बसाप्पा चंद्रशेखर नाईक, संजय सिदाप्पा नाईक व रवींद्र अप्पा नाईक यांनी विनायकवर राग धरला होता. त्यातूनच या सर्वानी २३ डिसेंबर २०१२ रोजी कडलगे गावातील विठ्ठल मंदिरापासून विनायक याचे मारुती ओमनी व्हॅनमधून अपहरण केले होते. ही घटना परशराम जाधव व श्रीकांत धनगर या दोघांनी विवाह समारंभातून परत येत असताना पाहिली होती. विनायकला ते लोक सोडून देतील असा समज करून या घटनेकडे दुर्लक्ष करून घर गाठले होते.
त्या रात्री विनायक घरी न परतल्याने त्याची आई आक्काताई यांनी गडिहग्लज पोलिस ठाण्यात विनायक बेपत्ता झाल्याची वर्दी दिली होती. तर दोन दिवसांनंतर विनायकचे अपहरण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर अक्काताई यांनी उपरोक्त सात जणांनी अपहरण केल्याची फिर्याद दिली. गडिहग्लज पोलिसांनी संबंधितांना अटक केली असता. आरोपींनी विनायकचा खून करून ओळख पटू नये म्हणून त्याचा मृतदेह वेदगंगा नदीमध्ये मांगूर पुलावरून टाकून दिल्याची कबुली दिली. त्यानुसार संबधित सात जणांवर खून व अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
राजकीय वैमन्यस्यातून विनायकचा खून झाला असल्याने राज्य शासनाने विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. प्रकाश हिलगे यांची नियुक्ती केली होती. खटल्याची सुनावणी गडिहग्लज येथील सत्र न्यायालयात होऊन त्यांच्या बदलीनंतर हा खटला उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर येथील न्यायालयात वर्ग करण्यात आला होता. खटल्याची पुढील सुनावणी येथेच झाली. फिर्यादी तर्फे नऊ साक्षीदार तपासण्यात आले होते. अपहरणाची घटना प्रत्यक्ष पाहणारे जाधव, धनगर व फिर्यादी अक्काताई यांचा जबाब तसेच अॅड. हिलगे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य़ मानून सर्व आरोपींना उपरोक्तप्रमाणे शिक्षा देण्यात आली. या खटल्यामध्ये अॅड. हिलगे यांना अॅड. विकास पाटील, अॅड. मुकुंदराज मोरे-पाटील, अॅड. नितीन बोरकर, अॅड.नवतेज देसाई व अॅड. सुदर्शन पाटील यांनी साहाय्य केले.
अॅड. हिलगे ठरले खुन्यांचे कर्दनकाळ
सदर खटल्यामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून काम केलेले अॅड. हिलगे हे खुन्यांचे कर्दनकाळ ठरले आहेत. यापूर्वी सर्व खटल्यांतील आरोपींना दोषी धरून शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यापैकी कसबा बीड येथील श्यामराव पाटील खूनखटल्यातील सर्व नऊ, कोतोलीतील आनंदा पाटील खून खटल्यामध्ये सर्व अकरा व इस्लामपूर येथील जाधवबंधू खून खटल्यामध्ये सर्व नऊ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.