देशात जसजसा हायटेक प्रणालींचा सदुपयोग होतोय, तसतसा तिचा दुरुपयोग होतानाही दिसतोय. वसईत असाच प्रकार उघडकीस आला. प्रेयसीला दुचाकीवरून फिरवण्यासाठी त्याने चक्क यू-टय़ुबवरून दुचाकी चोरण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर दुचाकी चोरण्यात सराईत होत आपली टोळी उभी केली. या ७ जणांच्या टोळीला वालीव पोलिसांनी ७ दुचाकींसह अटक करून ४ लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अधिकचा तपास सुरू  आहे.

पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील प्रमुख आरोपी प्रसाद पाटील याला प्रेयसीला फिरवण्यासाठी दुचाकी हवी होती. मात्र, पैसे नसल्याने त्याला ते शक्य नव्हते. यावेळी त्याने यू-टय़ुबचा आधार घेत चावीशिवाय गाडी कशी सुरू केली जाते याचे प्रशिक्षण घेतले. यानंतर काही काळ प्रशिक्षणासाठी तो मित्राच्या गॅरेजवर गेला. तिथे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याने स्वत: राहात असलेल्याच ठिकाणी चावीशिवाय गाडी चालू करण्याचे प्रशिक्षण घेतले. यानंतर सराईत झाल्यावर त्याने चोरी करायला सुरुवात केली. प्रसादकडील गाडय़ा-मोबाइल पाहून एक-एक असे सहा तरुण त्याच्या टोळीमध्ये सामील झाले आणि त्यांची ७ जणांची टोळी तयार झाली.  या टोळीने शहरात अनेक चोऱ्या केल्या. दरम्यान, मंगळवारी झालेल्या कारवाईत वालीव पोलिसांनी या सातही आरोपींना अटक केली.