समन्वय समितीकडून राजकीय परिस्थितीवर विचारमंथन

अकोला : अकोला जिल्हा परिषदेतील भारिप- बमसंच्या पदाधिकारी व सदस्यांच्या कामगिरीवर पुढील जबाबदारीचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यासंदर्भात समन्वय समितीकडून सोमवारी जि.प.चा आढावा घेऊन राजकीय परिस्थितीवर विचारमंथन करण्यात आले.

अकोला जिल्हा परिषदेच्या विकास कामासंदर्भात वंचित बहुजन आघाडीची समन्वय समिती व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी पार पडली. बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, अध्यक्ष प्रतिभा भोजने, उपाध्यक्ष सावित्री राठोड, समिती सदस्य प्रदीप वानखडे, दिनकर खंडारे आणि गटनेते ज्ञानेश्वर सुल्ताने, सभापती आकाश शिरसाट, सभापती पंजाबराव वडाळ आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषद सदस्यांच्या मतदारसंघात सुरू असलेली व प्रस्तावित विकास कामांचा आढावा घेण्यात आला. सदस्यांनी अधिकाधिक लोकाभिमुख राहून जि.प.च्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करावे आणि यासाठी जिल्हय़ातील पक्ष कार्यकर्त्यांच्या तक्रारी प्राधान्याने सोडवाव्यात, असे समन्वय  समितीकडून सुचवण्यात आले. २३ जूनच्या सर्वसाधारण सभेचे नियोजन केले. राजकीय परिस्थितीचा आढावा देखील घेण्यात आला. यापुढे पदाधिकारी व कामगिरीच्या आधारावर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे ठरवण्यात आले. समन्वय समितीने मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांच्यासोबत बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.