पंधरा सदस्यांना अल्पकाळ लाभ

लोकसत्ता प्रतिनिधी

पालघर: पालघर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व सदस्यांना जिल्हा परिषदे मार्फत (बॅज) बिल्ले वाटप करण्यात आले. मात्र जिल्हा परिषदेच्या १५ सदस्यांना तसेच पालघर पंचायत समितीच्या नऊ सदस्यांना या बिल्ल्याचा वापर देखील करता आला नाही.

जिल्हा परिषद सदस्य अथवा पंचायत समिती सदस्य कुठल्याही कार्यालयात अथवा कामासाठी गेल्यास त्यांची ओळख पटावी व त्यांचा मान राखला जावा या उद्देशाने हे ‘बॅज’ देण्यात आले असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालिमठ यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या विशेष सभेमध्ये सदस्यांना हे ‘बॅज’ देण्यात आले. तर पंचायत समिती सदस्यांना वाटप करण्याचे काम सुरू आहे. जिल्हा परिषद सदस्य गटनिहाय व पंचायत समिती सदस्य गणनिहाय क्रमांक व पदाचा कालावधी असे या बिल्लय़ाचे स्वरूप असून प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हा परिषद अध्यक्षा भारती कामडी, उपाध्यक्ष नीलेश सांबरे, विरोधी पक्षनेत्या सुरेखा थेतले, सदस्य प्रकाश निकम, नरेश आकरे यांना बॅज देण्यात आले.

अल्पावधीचा कार्यकाळ

वर्ष २०१२ मध्ये ठाणे जिल्हा परिषदेवर निवडून गेलेल्या सदस्यांचा दोन- सव्वा दोन वर्षांत पालघर जिल्हा निर्माण झाल्याने कार्यकाळ संपुष्टात आला होता. तर २०२० मध्ये निवडून आलेल्या जिल्हा परिषदेच्या १५ सदस्यांचे सदस्यत्व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अवघ्या वर्षभरात रद्द झाले.