राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत आशा स्वयंसेविका प्रशिक्षणासाठी निधी उपलब्ध केल्याच्या नावाखाली ९ हजार रुपये रकमेची लाच घेताना जि. प.अंतर्गत वैद्यकीय अधिकारी डॉ. देविदास वामनराव आडे याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
सेनगाव तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी या प्रकरणी लाचलुचपत विभागात तक्रार दिली होती. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत आशा स्वयंसेविका प्रशिक्षणासाठी ६२ हजार १०० रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला, म्हणून आडे याने ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली, अशी तक्रार शुक्रवारी केली होती. पथकाने या तक्रारीची पडताळणी केली. आशा स्वयंसेविका प्रशिक्षणाचे बिल तयार करून मंजूर करून देतो, असे सांगून आडे याने नंतर ४ हजार रुपये अशी एकूण ९ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. ही रक्कम शनिवारी जि. प.मध्ये होणाऱ्या बठकीत घेऊन येण्यास आडेने सांगितले होते. त्यावरून जि. प.मध्ये पथकाने सापळा लावला. लाचेची रक्कम दुपारी २ वाजता आरोग्य विभागातील राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान विभाग क्र. १५ समोर घेत असताना पथकाने आडे याला पकडले. या प्रकरणी िहगोली शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

फुलंब्रीच्या तत्कालीन लाचखोर तहसीलदारास ७ वर्षे सक्तमजुरी

प्रतिनिधी, औरंगाबाद</em>
केरोसिन टँकरचे इनव्हाइस देण्यासाठी, तसेच केरोसिनचा पुरवठा बंद न करण्याची शिफारस करण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या फुलंब्रीचे तत्कालीन तहसीलदार उत्तम शंकरराव तुपे यास सात वर्षे सक्तमजुरी व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. प्रथम तदर्थ विशेष न्यायालयाने हा निकाल दिला.
आरोपी लोकसेवक तुपे याने ३१ ऑगस्ट २००६ रोजी फुलंब्रीत तहसीलदार म्हणून काम करताना तक्रारदाराकडे त्याचे १२ ऑगस्ट व २८ ऑगस्ट २००६ रोजी खाली झालेल्या केरोसिन टँकरचे इनव्हाइस देण्यासाठी, तसेच केरोसिनचा पुरवठा बंद न करण्याची शिफारस करण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने या बाबत औरंगाबादच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. विभागाच्या पथकाने साक्षीदारासमक्ष लाच घेताना तुपे याला रंगेहाथ पकडले. तुपे याच्याविरुद्ध फुलंब्री पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
या प्रकरणी तत्कालीन तपासी अंमलदार लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक ए. व्ही. राजपूत यांनी तपास करून तुपे व नायब तहसीलदार प्रणाली तायडे या दोघांविरुद्ध विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्या. एस. बी. कचरे यांच्यासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. तुपे यास एका कलमान्वये ३ वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद, तर दुसऱ्या एका कलमान्वये ४ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. या खटल्यातून तायडे यांना निर्दोष मुक्त करण्यात आले.