राज्यातील सत्ता संघर्ष शिगेला पोहचला आहे. महाविकास आघाडीकडून व भाजपाकडूनही बहुमत सिद्ध करणार असल्याचा दावा केला जात आहे. एकीकडे महाविकास आघाडीच्यावतीने सादर करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालाय सुनावणी सुरू आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अजितदादांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरूच असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी अजितदादांनी चूक केली आहे, त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, असे सांगितले आहे.

”आमच्याकडे १६५ आमदारांचं पाठबळ आहे. राष्ट्रवादीचे ५३ आमदार आमच्याबरोबर आहेत. अजित पवारांनी चूक केली आहे, त्यांनी राजीनामा द्यायला हवा. देवेंद्र फडणवीस यांना हे समजले पाहिजे की त्यांच्याकडे बहुमत नाही, आपण चूक केली आहे हे त्यांना समजलं पाहिजे. जर त्यांनी राजीनामा दिला नाहीतर आम्ही या सरकारला विधीमंडळाच्या पटलावर नक्कीच पराभूत करू ” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

राज्यातील सत्तासंघर्षाला शनिवारी अगदीच अनेपेक्षित कलाटणी मिळाली. भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ शनिवारी घेतली. अचानक घडलेल्या या शपथविधीमुळे राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. त्यानंतर अजित पवारांनी दिलेलेलं समर्थन हे वैयक्तीक आहे हा राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर रंगलेल्या राजकीय नाट्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबामध्ये फूट पडल्याचे स्पष्ट झालं.