चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख करताना चंपा हा शब्द माझ्यासमोर पहिल्यांदा एका भाजपा कॅबिनेट मंत्र्यानेच वापरल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. मात्र हा नेता कोण आहे याबद्दलची माहिती आपण निवडणुकीनंतर देणार आहोत असंही पवार यांनी सांगितलं.

चंपा या शब्दावरुन कोथरुडमधील राजकारण चांगलेच तापले आहे. येथून भाजपाच्या तिकीटवर उभे असलेले राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख विरोधक अनेक सभांमध्ये चंपा असा करत आहेत. चंपा असा उल्लेख सर्वात पहिल्यांदा करणाऱ्या अजित पवार यांनी हा शब्द मी शोधला नसून तो एका भाजपाच्याच कॅबिनेट मंत्र्याच्या तोंडून ऐकल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘आमच्या संघटनेच्या एका सहकाऱ्याबरोबर मी काही कामानिमित्त एका मंत्र्यांकडं गेलो होतो. त्यावेळी त्या सहकाऱ्याने मंत्री मोहदयांना तुमचे शिफारस पत्र असेल तर काम लवकर होईल, कामात जरा मदत होईल असं सांगितलं. त्यावेळी मंत्र्यानी त्या सहकऱ्याला माझं शिफारस पत्राची कितपत मदत होईल ठाऊक नाही. माझं ऐकतील की नाही सांगता येत नाही,’ असं मत व्यक्त केल्याचं अजित पवारांनी सांगितलं. ‘हे मंत्रीमोहदय पुढे म्हणाले, अरे चंपा माझं ऐकत नाहीत. त्यावेळी मी म्हटलं काय. बाहेर आल्यानंतर सहकाऱ्याशी बोलताना मला चंपाचा अर्थ उलगडला चंद्राकांतमधील चं आणि पाटील मधला पा एकत्र करुन त्या भाजपाच्या कॅबिनेट मंत्र्याने हा शॉर्टफॉर्म बनवल्याचे माझ्या लक्षात आलं,’ असं स्पष्टीकरण अजित पवारांनी पत्रकारांसमोर दिलं. ही सर्व घटना तीन-चार महिन्यांपूर्वीची असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.

त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये एकदा पत्रकारांबरोबर बोलताना मी हा शब्द वापरला. ‘सध्या राज्यात काम करणारी मंत्र्यांची फळी ही दुसऱ्या पिढीमधील नेत्यांची आहे. यांच्या वडीलांनी वगैरे पवारसाहेबांबरोबर काम केलं आहे. त्यामुळे त्यांनी सतत पवारांवर टीका करणे मला पटलं नाही आणि बोलता बोलता मी हा शब्द वापरला आणि तो हिट झाला,’ असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं आहे. हडपसर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार चेतन तुपे यांच्या प्रचारार्थ प्रचारार्थ रोड शोचे आयोजन केले होते. त्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवारांनी राज्यातील अनेक घडामोडी बाबत भूमिका मांडली.

आणखी वाचा : “काय चेष्टा लावली आहे राव”, एकामागोमाग एक भाषणांमुळे अजित पवार भडकले

दादांना सांगणार

चंद्रकांत पाटील यांना आपण यासंदर्भात भेटल्यावर आवर्जून माहिती देणार आहोत असंही पवारांनी यावेळी स्पष्ट केलं. ‘आता मी स्वत: दादांना सांगणार आहे. की दादा तुम्ही ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसत होता त्याच शहाण्याने हा शब्द पहिल्यांदा वापरला,’ हे सांगणार आहोत असं पवार म्हणाले.