News Flash

भाजप कमी जागांवर सेनेला झुकवणार

अमित शहा- उद्धव भेट झाल्यास युती पक्की

(संग्रहित छायाचित्र)

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा रविवारी मुंबईत येत असून त्यांनी भाजप-शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब करावे या दृष्टीने शनिवारी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जागावाटपावर चर्चा सुरू होती. सेनेने जरी वारंवार निम्म्या जागांचा आग्रह जाहीरपणे धरला असला, तरी भाजप मात्र त्याबाबत त्यांना नमवून त्यापेक्षा कमी जागांवर राजी करण्याचे चित्र सध्या दिसत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युती होईल असे सांगत असले तरी अद्याप जागावाटपाचे गणित सुटलेले नाही. त्यामुळे युतीची घोषणा रखडली आहे. जागावाटपावर शहा, फडणवीस आणि मी अंतिम निर्णय घेऊ, असेही उद्धव ठाकरे यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. तर शहा यांनी जागावाटपाचे तपशील ठरवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना अधिकार दिले आहेत. भाजप-सेनेतील जागावाटपाच्या वाटाघाटीत नीरज गुंडे मुख्यमंत्री फडणवीस आणि ठाकरे यांच्यात दुवा म्हणून काम करत आहेत. मित्रपक्षांना देण्यात येणाऱ्या १८ जागा दोन्ही पक्षांनी नऊ-नऊ अशा विभागून घ्याव्यात, असा प्रस्ताव भाजपने ठेवला होता. मात्र, सर्व घटकपक्ष भाजपचे मित्रपक्ष असल्याने त्यांनीच सर्व १८ जागा सोडाव्यात आणि १२६ जागा द्याव्यात, असे उत्तर शिवसेनेने पाठवले.

अनुच्छेद ३७० रद्द केल्यामुळे त्याबाबत जनजागृती करण्याचा निर्णय भाजपने घेतला असून त्यावरील भाषणासाठी अमित शहा आज, रविवारी मुंबईत येत आहेत. सकाळी ११ वाजता गोरेगाव येथे त्यांचा कार्यक्रम आहे. शहा यांच्या नियोजित कार्यक्रमामध्ये त्यांची उद्धव ठाकरे यांच्याशी भेट ठरलेली नाही. मात्र जागावाटपाबाबत सारे काही सुरळीत झाले, तर ती होण्याची चिन्हे आहेत.

शनिवारी दिवसभर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांसह जागावाटपाबाबत चर्चा केली. जागावाटपात कोणाला किती जागा सोडायच्या याबरोबरच इतर पक्षांतील नेते-आमदार भाजप आणि शिवसेनेत आल्याने काही मतदारसंघांची अदलाबदल करणे आवश्यक आहे. त्यामुळे एक मतदारसंघ भाजपला सोडताना त्यांच्याकडून त्या बदल्यात कोणता मतदारसंघ मागता येईल, शिवसेनेचा एकही आमदार नसलेल्या पुण्यासारख्या शहरात कोणती जागा पदरात पाडून घेता येईल, अशा विविध विषयांवर चर्चा झाली. उद्धव-फडणवीस यांच्यात जागावाटपावर सहमती व्हावी असा प्रयत्न शनिवारी दोन्ही बाजूंकडून सुरू होता.

घटस्थापनेपूर्वीही युतीचा निर्णय?

युती १०० टक्के होणार. जागावाटप अंतिम झाल्यावर कधीही युतीची घोषणा होऊ शकते. युतीचा निर्णय घटस्थापनेआधीही होऊ शकतो, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. भाजप-शिवसेना महायुती विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला राज्यात मिळालेला प्रचंड प्रतिसाद ध्यानात घेता २२० पेक्षा जास्त जागाही मिळू शकतात, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

सारे काही भेटीवर..

अमित शहा यांच्या मुंबईतील नियोजित कार्यक्रमामध्ये त्यांची उद्धव यांच्याशी भेट ठरलेली नाही. ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर जागावाटप सूत्राबाबत शनिवारी दिवसभर खलबते सुरू होती. जागावाटपावर सहमती झाली आणि युतीसाठी ठाकरे यांनी संपर्क साधला, तर त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी रविवारी शहा-ठाकरे-फडणवीस यांच्यात भेट होऊ शकते, असे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2019 2:02 am

Web Title: amit shah uddhav thackeray alliance to discuss abn 97
Next Stories
1 महापुराचे पूर्वानुमान सांगणारी प्रणाली तयार
2 बेकायदा प्रयोगशाळांवर कारवाई करणारा शासन निर्णय प्रलंबितच!
3 राज्यात पनवेलमध्ये सर्वाधिक मतदार
Just Now!
X