वांद्रे पूर्वची जागा शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान या मतदारसंघात येते. शिवसेनेने या मतदारसंघात महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली आहे. मातोश्रीच्या या निर्णयावर नाराज होऊन विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी बंडखोरी करुन आपल्याच पक्षाला आव्हान दिले आहे. माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे.

वांद्रे पूर्व, खार पूर्व, कलानगर आणि वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्सचा काही भाग या मतदारसंघात येतो. १९९९ ते २००९ या काळात इथून काँग्रेस उमदेवाराने विजय मिळवला. २००९ पासून ही जागा शिवसेनेकडे आहे. २०१५ साली शिवसेना आमदार बाळा सावंत यांचे निधन झाले. त्यावेळी पक्षाने त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली. काँग्रेसने त्यावेळी नारायण राणे यांना वांद्रे पूर्वमधून उमेदवारी दिली. निवडणूक जिंकण्यासाठी राणे यांनी आपली पूर्ण ताकत पणाला लावली. पण शिवसैनिकांच्या पाठबळाच्या जोरावर तृप्ती सावंत यांनी या मतदारसंघातून बाजी मारली.

यावेळी मातोश्रीने विश्वनाथ महाडेश्वर यांना संधी दिली आहे. महाडेश्वर १५ वर्ष नगरसेवक आहेत. तृप्ती सावंत या गेली चार वर्ष स्थानिक शिवसैनिकांच्या संपर्कात नव्हत्या अशी चर्चा आहे. महाडेश्वर यांनी वांद्र पूर्वमधून निवडणूक लढवण्यासाठी आधीच तयारी सुरु केली होती. त्या दृष्टीने त्यांनी मतदारसंघाची बांधणी केली होती. पण विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासाठी ही लढाई इतकी सोपी नाही.

कारण विद्यमान आमदार तृप्ती सावंत आणि झीशान सिद्दीकीचे आव्हान समोर आहे. काँग्रेसची अल्पसंख्यांक आणि दलित मतांवर मदार आहे. हा काँग्रेसचा पारंपारिक मतदार आहे. महापौर झाल्यापासून वेगवेगळया वक्तव्यांमुळे विश्वानाथ महाडेश्वर वादांमध्ये अडकले आहेत. वांद्रे पूर्वमधून मनसेकडून अखिल चित्रे, एआयएमआयएमकडून मोहम्मद कुरेशी आणि वंचित बहुजन आघाडीकडून जावेद शेख रिंगणात आहेत.

मनसेमुळे मराठी मतांचे विभाजन होऊ शकते. त्यात तृप्ती सावंत यांचे आव्हान आहे. कुरेशी आणि शेख यांना मिळणाऱ्या मतांमुळे सिद्दीकी यांचे नुकसान होऊ शकते. २०१४ साली युती झाली नव्हती तेव्हा शिवसेनेला स्वबळावर ४१ हजार, भाजपाला २५ हजार, एआयएमआयएमला २३ हजार, काँग्रेसला १२ तर राष्ट्रवादीला ९ हजार मते मिळाली होती. फुटपाथवर अतिक्रमण, पाणी तुंबणे या भागातल्या मुख्य समस्या आहेत.