सोमवारी राज्याच्या विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. ठाकरे कुटुंबातील पहिले व्यक्ती आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अशातच त्यांच्या समोर अॅड. सुरेश माने आणि अभिजित बिचुकले यांचं आव्हान असल्यानं या मतदारसंघात रंगत आली होती. त्यानंतर आता बिचुकले यांनी ठाकरे कुटुंबीयांवर गंभीर आरोप केला आहे. मला हरवण्यासाठी ठाकरे कुटुंबीयांना पैसा वापरावा लागल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं वरळीतून चार कोटी रूपयांची रक्कम जप्त केली होती. ती रक्कम आपल्याला हरवण्यासाठी आणल्याचा दावा, बिचुकलेंनी केला. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे. मी मुंबईत आलो आणि मुंबईकरांनी आपल्याला खुप प्रेम दिलं. वरळीतून मी निवडणूक अर्ज भरला. परंतु माझी लोकप्रियता पाहून आपला पराभव करण्यासाठी पैशांचं वाटप करण्यात आल्याचा आरोप बिचुकलेंनी केला.

राजकारणातले नेते लोकांना फसवतात. ते सर्वात मोठे अभिनेते असतात. उद्धव ठाकरे हे १० रूपयांमध्ये कशी थाळी देतात हे आपल्याला पहायचे असल्याचंही ते म्हणाले. परंतु निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्याविरूद्ध जरी आपण उभे असलो तरी त्यांच्याकडून आपल्याला कोणताही त्रास झाला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

अभिजित बिचुकले यांनी वरळीतून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यापूर्वी विधानसभा निवडणुकीत त्यांनी २८८ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं होतं. त्यांनंतर “२८८ जागा लढवण्यासाठी सध्यातरी माझ्याकडे तेवढा वेळ नाही. मात्र दोन्ही राजे जे टोलनाका, दारुचे दुकान, कार्यकर्ते या क्षुल्लक गोष्टींसाठी भांडत असतात, त्यामुळे यंदा सातारकरांनी नीट विचार करावा. या दोन्ही राजांना राजे राहू द्या आणि तुमच्या अभिजित बिचुकलेला विधानसभा आणि लोकसभेसाठी पाठवा,” असं ते म्हणाले होते.