प्रशांत देशमुख, वर्धा

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजपमधील इच्छुक नेत्यांची सावंगीच्या ‘दत्तगणेशास’ साकडे घालण्यासाठी रांग लागली आहे.

सावंगी येथील गणेशोत्सव विविध कार्यक्रमांमुळे सर्वत्र चर्चेत असतो. पण यासोबतच राजकीय घडामोडींनीसुद्धा हा महोत्सव चर्चेत येतो. माजी खासदार दत्ता मेघे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राजकीय भक्तांचा तोंडवळा बदलला. भाजपअंतर्गत घडामोडींची या ठिकाणी चर्चा घडत गेली. महोत्सवाच्या दहा दिवसात मेघेंचा पूर्णवेळ मुक्काम असतो. भाजपमध्ये आल्यानंतर जिल्हय़ाला शंभर टक्के भाजपमय करण्याची गर्जना मेघे यांनी केली होती. जिल्हा परिषदेत कमळ फु लवून त्यांनी ते सिद्धही केले. पुढे विधान परिषदेच्या निवडणुकीत रामदास आंबटकर यांच्यासाठी व्यूहरचना करण्यात मेघे आघाडीवर होते. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी भाजपमध्ये वेगात सुरू आहे. त्यासाठी सावंगीत घडामोडींना वेग आला आहे. सावंगीच्या गणेशाचे दर्शन घेतानाच राजकीय आशीर्वाद घेण्याचाही हेतू इच्छुकांनी ठेवला आहे. कारण गत विधानसभा निवडणुकीत जिल्हय़ातील उमेदवार पक्के करताना मेघेंचा शब्द कामात आला होता. मेघेंनी पंकज भोयर व समीर मेघे यांच्यासाठी शब्द टाकला. तो फ ळास गेला. यावेळी निवडणूक लढण्याची प्रबळ इच्छा ठेवणारे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांनी तर सावंगीचरणीच माथा टेकला. पक्षांतर्गत ते खासदार रामदास तडस यांचे विरोधक समजले जातात. देवळीतून लढण्यास इच्छुक बकाने यांना सावंगीचा आशीर्वाद महत्त्वाचा ठरतो. आमदार डॉ. पंकज भोयर यांनी महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी आरतीचे ताट पकडले आणि मेघेंचा आशीर्वादही घेतला. खासदार रामदास तडस यांचा मेघेंशी काही काळापासून दुरावा राहिला आहे. पण तेसुद्धा सावंगीच्या गणेशाचा प्रसाद घेऊन आले. सावंगीचा गणेश मला नेहमीच पावतो, असे ते बोलत असतात. वध्रेचे नगराध्यक्ष अतुल तराळे हे वध्रेतून लढण्यास इच्छुक आहेत. त्यांचीही सावंगीला फे री झाली. विद्यमान आमदारास टाळून आपल्याला तिकीट मिळावी, अशी इच्छा त्यांनी दर्शवली आहे. हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांनी भेटीसाठी येत असल्याचा निरोप पाठवून राजकीय पाठबळ पक्के करण्याचा मानस ठेवला. यासोबतच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही दर्शन घेऊन आले आहेत.

पण प्रामुख्याने भाजपच्या नेत्यांच्या या काही दिवसात सावंगीला फेऱ्या  झाल्यात. मेघे यांनी शब्द टाकल्यास आपले पारडे जड ठरू शकते, अशी या इच्छुकांची धारणा आहे. याविषयी बोलताना दत्ता मेघे म्हणाले की, राजकीय नेतेमंडळी चर्चेसाठी व गणेश दर्शनासाठी नेहमीच येतात. विधानसभा निवडणूक डोळय़ापुढे ठेवून ते आलेत, असे मी म्हणणार नाही. मला पक्षाच्या बैठकीत आवर्जून निमंत्रण असते. पण मी स्पष्ट मत मांडत नाही. भाजपची निर्णय प्रक्रिया ठरल्याप्रमाणेच चालते. त्यात दबाव आणण्याचा भाग नसतो. मेघे यांनी या शब्दात आपली भूमिका मांडताना उमेदवारीबाबत भाष्य करण्याचे टाळले.