यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वडाळा विधानसभा मतदारसंघाच्या निकालाकडे सगळयांचे लक्ष लागले आहे. सलग २९ वर्षांपासून आमदार असलेल्या कालिदास कोळंबकरांसमोर यंदा खडतर आव्हान आहे. शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणारे कोळंबकर आता भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. वडाळा हा मराठीबहुल मतदारसंघ आहे. कोळंबकर शिवसेनासोडून काँग्रेसमध्ये गेल्यानंतरही त्यांनी सहज विजय मिळवला.

सलग आठव्यांदा निवडणूक जिंकू असा त्यांना विश्वास आहे. १९९० ते २००४ या काळात ते शिवसेनेच्या तिकीटावर सलग चार वेळा विधानसभेवर निवडून गेले. २००४ मध्ये नारायण राणे शिवसेनेची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेल्यानंतर कोळंबकर सुद्ध काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसच्या तिकीटावर ते तीनदा विधानसभेवर निवडून गेले. वडाळयामध्ये यंदा कोळंबकरांसमोर काँग्रेसकडून शिवकुमार लाड यांचे आव्हान आहे. कोळंबकर यांचा तळागाळात जनसंपर्क असला तरी शिवसेना त्यांच्यावर नाराज आहे.

शिवसेनेची सुद्धा या मतदारसंघात बऱ्यापैकी ताकत आहे. शिवसेनेकडून नगरसेविका श्रद्धा जाधव या जागेसाठी आग्रही होत्या. हा मतदारसंघ भाजपाकडे गेल्यानंतर त्यांनी मातोश्रीवर जाऊन आपली नाराजी जाहीर केली. शिवसेनेची नाराजी कोळंबकर यांना भोवण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांचे मन वळवण्याचे अवघड आव्हान कोळंबकर यांच्यासमोर आहे.

वडाळा विधानसभा मतदारसंघात नायगाव, फाईव्ह गार्डन, माटुंगा, नाडकर्णी पार्क आणि दादरचा काही भाग येतो. श्रीमंत, मध्यमवर्ग, चाळींसह झोपडपट्टीचा मोठा भाग या मतदारसंघात येतो. गेल्यावेळी फक्त काहीशे मतांनी कोळंबकर निवडून आले होते. बीडीडी चाळींच्या पूनर्विकासाचा, पोलिसांसाठी घरांचा प्रश्न आहे. वडाळयात शिवसेना भाजपाला कितपत साथ देईल याबद्दल साशंकता आहे. त्यामुळे हा मतदारसंघ कालिदास कोळंबकरांसाठी सोपा नाही.