विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपा-शिवसेनेने झोकून दिले असतानाच महायुतीत कुरबुरी सुरू झाल्या आहेत. महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी जागावाटपावरून नाराजी व्यक्त केली आहे. “भाजपाने मला फसवलं, माझ्या पक्षाला धोका दिला आहे,” असा आरोप जानकर यांनी केला आहे. तसेच दौंड, जिंतूरच्या जागेचा निर्णय पक्षाचे कार्यकर्ते घेतील, असे सांगत त्यांनी असहकार्याचे संकेत दिले आहे.

भाजपा-शिवसेना महायुतीचे जागा वाटप झाले. उमेदवारांनी अर्जही भरले. जागावाटपात शिवसेनेला १२४ जागा देण्यात आल्या तर भाजपाच्या वाट्याला मित्रपक्षांसह १६४ जागा आल्या आहेत. यात १५० जागांवर भाजपाने स्वतःचे उमेदवार दिले आहे. जागावाटपात अन्याय झाल्याचे सांगत मित्र पक्ष नाराज झाले आहेत. दरम्यान, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनीही मुंबईत पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाविषयची मनातील खदखद व्यक्त केली.

जानकर म्हणाले, ” जागावाटपाचं बोलणं झालं होतं. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली होती. पण, सरळसरळ फसवलं आहे. भाजपाने मला फसवलं. माझ्या पक्षाला धोका दिला,” असा आरोप जानकर यांनी केला. “दौंड, जिंतूर विधानसभा मतदारसंघाबाबत पक्षाचे कार्यकर्ते निर्णय घेतील. सध्या गंगाखेड हा मतदारसंघ शिवसेनेकडे असून, त्या ठिकाणी रत्नाकर गुट्टे हे रासपचे उमेदवार असतील,” अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.

आणखी वाचा- आठवी शिकलेले रत्नाकर गुट्टे अब्जाधीश उमेदवार

पुढे बोलताना जानकर म्हणाले, “गंगाखेडमधून रत्नाकर गुट्टे हे रासपचे उमेदवार असल्याने शिवसेना-भाजपाकडे उमेदवार मागे घेण्याची विनंती करू. तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी मित्रपक्षांबाबत केलेले विधान बरोबर आहे,”असंही ते म्हणाले.