विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. गुरूवारी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा मतदारसंघ असलेल्या परळीमध्ये पंतप्रधानांची सभा झाली. यावेळी मोदींनी विरोधकांवर कलम ३७० वरून निशाणा साधला. मात्र यासभेला भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पैसे देऊन गर्दी गोळा केल्याचा आरोप करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन महिला मोदींच्या सभेसाठी आम्हाला ६०० रुपये रोजाने बोलवण्यात आले होते असा दावा केला आहे. मात्र या महिलांना ६०० रुपये देण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्याने त्यांना नकार दिल्याने त्या या व्हिडीओमध्ये या पदाधिकाऱ्याशी भांडताना दिसत आहे. ‘आम्ही शेजारच्या बाणगावमधील असून आम्हाला प्रत्येकी ६०० रुपये देतो असं सांगून या सभेला येण्यास सांगितले होते. आम्ही सभेला आलो. आता ही व्यक्ती आम्हाला पैसे देत नाहीय,’ असा आरोप या महिलांनी व्हिडिओमध्ये केल्याचे दिसत आहे. या महिला आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मध्यस्थी करणाऱ्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ शूट केल्याचे दिसत आहे. हा मध्यस्थी करणारा व्यक्ती या दोन्ही महिलांना त्यांचे १२०० रुपये देण्याची मागणी भाजपाच्या पदाधिकाऱ्याकडे करताना दिसत आहे. ‘पैसे देऊन सभेला गर्दी जमवता. हेच का तुमचे अच्छे दिन’ असा सवालही उपस्थित नागरिकांनी या पदाधिकाऱ्याला विचारल्याचे व्हिडिओमध्ये ऐकू येते. अनेक विरोधी पक्षांच्या समर्थकांनी फेसबुकच्या वेगवगेळ्या पेजेसवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे.

दरम्यान, “भाजपाने जेव्हा जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवलं, तेव्हा काँग्रेससह सर्वांनी विरोध केला. ही लोकशाहीची हत्या असल्याची भाषा वापरली. विरोधकांच्या या कर्माच्या शिक्षा देश त्यांना देईल. पण पहिली संधी महाराष्ट्राला मिळाली असून, ती सोडू नका,” असं आवाहन मोदींनी या सभेमध्ये केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader paid people to attend pm modi public meeting at parli scsg
First published on: 18-10-2019 at 16:36 IST