पंतप्रधानांसह भाजपचे नेते सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर काहीच बोलत नाहीत. त्यांना केवळ बिनपैशांच्या गोष्टी आठवतात. जम्मू काश्मिरातील ३७० कलम, राष्ट्रवाद यावर ते ठासून बोलतात, पण शेतमालाला भाव, बेरोजगारी, मंदी याविषयी चिक्कार शब्द काढत नाहीत, अशी टीका छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी मंगळवारी नांदगावपेठ येथे केली.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या तिवसा मतदारसंघातील उमेदवार यशोमती ठाकूर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर मध्यप्रदेशचे मंत्री सुखदेव पांसे, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे आदी मंचावर उपस्थित होते.

भूपेश बघेल म्हणाले, काँग्रेसचा राष्ट्रवाद स्पष्ट आहे. सर्व धर्म, जातींना काँग्रेसमध्ये स्थान आहे. याउलट भाजपा, आरएसएसचा राष्ट्रवाद हा हिटलर, मुसोलिनीच्या विचारांनी प्रभावित आहे. आज देशात नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्याविरोधात बोललो तर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल होतो.

भाजपचे नेते आम्हाला देशभक्ती, राष्ट्रवाद शिकवायला निघाले आहेत. परंतु, नथुराम गोडसेचे गुणगाण करणाऱ्यांनी आम्हाला देशभक्ती, राष्ट्रवाद शिकवू नये.

भाजपच्या नेत्यांना आज महात्मा गांधी यांची आठवण येत आहे. त्यांनी महात्मा गांधींना स्वीकारावे. आम्ही त्याचे स्वागत करतो. परंतु, त्यापूर्वी भाजपच्या नेत्यांनी नथुराम गोडसेंना मुर्दाबाद म्हटले पाहिजे. आम्ही छत्तीसगडमध्ये भाजपच्या नेत्यांना हे आव्हान दिले होते, त्यांनी ते पूर्ण केले नाही. गांधीजींना मनापासून स्वीकारू न शकणाऱ्यांनी त्यांची जयंती साजरी का करावी, असा प्रश्न भूपेश बघेल यांनी उपस्थित केला.

पुलवामा हल्ल्याच्या प्रकरणानंतर भाजपने राष्ट्रवादाच्या नावावर लोकसभा निवडणूक जिंकली. परंतु, हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना न्याय देण्यासाठी या प्रकरणाची चौकशी केली नाही. मोठय़ा प्रमाणात आरडीएक्सचे कुठून आले? बुलेटप्रूफ नसलेल्या वाहनालाच धडक कशी दिली? हे प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहेत.

भाजपचे नेते आज ३७० कलमबद्दल बोलत आहे. परंतु, आर्थिक मंदी, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला ते तयार नाहीत. लोकसभा निवडणुकीपूर्वी दिलेली सर्व आश्वासने आज हवेत विरली आहेत. शेतकरीविरोधी भाजप सरकारने रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाकडून एक लाख ७४ हजार कोटी काढून ते देशातील बडय़ा उद्योगपतींना दिल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

यशोमती ठाकूर या गेल्या दहा वर्षांपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. गेल्या पाच वर्षांत विरोधी पक्षात राहूनही त्यांनी मोठय़ा प्रमाणात विकासकामे केली आहेत. त्या सर्वसामान्यांच्या प्रश्न व समस्यांची जाण असलेल्या आणि विकासाची दूरदृष्टी असलेल्या लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे मतदारसंघाच्या सर्वागीण विकासासाठी यशोमती ठाकूर यांना हॅट्ट्रिकची संधी द्या, असे आवाहन यावेळी भूपेश बघेल यांनी केले.