हडपसर, वडगांव शेरीच्या जागा पक्षाने गमावल्या

शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीप्रमाणे ‘शत प्रतिशत’ विजय मिळेल, हा भाजपचा दावा गुरुवारी मतमोजणी नंतर फोल ठरला. हडपसर आणि वडगांवशेरी या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळविला. कोथरूड, कसबा आणि पर्वती विधानसभा मतदारसंघात भाजपने निर्विवाद विजय मिळविला. मात्र शिवाजीनगर, खडकवासला आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात विजयासाठी भाजपला संघर्ष करावा लागला. त्यामुळे सहा जागा मिळवूनही भाजपच्या शहर कार्यालयात सामसूम राहिली. विजयाचा जल्लोषही कार्यकर्त्यांकडून शहर कार्यालयात करण्यात आला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीने भाजपला दिलेली कडवी लढतच चर्चेचा विषय ठरली.

कसबा, कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर, वडगांवशेरी, पुणे कॅन्टोन्मेंट आणि हडपसर या आठ मतदारसंघातील मतमोजणी गुरुवारी झाली. यामध्ये कसब्यातून महापौर मुक्ता टिळक, कोथरूडमधून चंद्रकांत पाटील, पर्वतीमधून माधुरी मिसाळ, पुणे कॅन्टोन्मेंटमधून सुनील कांबळे आणि खडकवासल्यातून भीमराव तापकीर हे भाजपचे उमेदवार विजयी झाले. यातील माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर यांनी विजयाची हॅटट्रीक नोंदविली. तर मुक्ता टिळक आणि चंद्रकांत पाटील हे प्रथमच विधानसभेवर निवडून गेले. हडपसरमधून चेतन तुपे यांनी विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांना, तर वडगांवशेरीतून सुनील टिंगरे यांनी जगदीश मुळीक यांना पराभवाचा धक्का दिला.

गेल्या विधानसभा निवडणुकीत आठही मतदारसंघात भाजपने निर्विवाद वर्चस्व राखले होते. निवडणुकीसाठी शिवसेनेसोबत युती झाल्यानंतरही भाजपच सत्तेवर येणार अशी अटकळ बांधत भाजपने जागा वाटपात शिवसेनेला डावलले आणि आठही जागांवर उमेदवार उभे केले. यातील दोन मतदारसंघ मिळावेत, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. मात्र ती डावलण्यात आली. त्याचा फटकाही भाजपला बसला. आमदारांची निष्क्रियता, सत्ताधारी भारतीय जनता पक्षापुढे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने निर्माण केलेले आव्हान यामुळे भाजपला आठही जागा राखण्यात अपयश आले.

राज्यात प्रतिष्ठेची ठरलेली कोथरूडची निवडणूक चंद्रकांत पाटील जिंकले असले तरी अपेक्षित मतदान त्यांना झाले नाही. त्यामुळे मताधिक्यावरही त्याचा थेट परिणाम दिसून आला. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कोथरूडमधून जेमतेम २५ हजार ४९५ मतांनी चंद्रकांत पाटील विजयी झाले. त्या तुलनेत कसब्यातून मुक्ता टिळक यांना २८ हजार २९६ एवढे मताधिक्य मिळाले. तर पर्वतीमधून माधुरी मिसाळ यांनी ३६ हजार ७६७ मतांनी विजयी संपादन केला. शिवाजीनगरमध्ये शिरोळे यांना ५ हजार १२४ एवढे मताधिक्य मिळाले. खडकवासल्यात तापकीर यांनी २ हजार ५९५ मतांनी, तर पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये सुनील कांबळे यांनी ५ हजार १२ मतांनी विजय मिळविला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे बालेकिल्ला असलेल्या हडपसर आणि वडगांवशेरी मतदार संघात भाजपने गेल्या निवडणुकीत विजय मिळविला होता. मात्र या दोन्ही मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे हडपसरमधील उमेदवार चेतन तुपे आणि वडगांवशेरीतून सुनील टिंगरे यांनी विद्यमान आमदार जगदीश मुळीक आणि योगेश टिळेकर यांना जोरदार धक्का दिला. विद्यमान आमदारांची कामाबाबतची निष्क्रियता आणि आघाडीचे मजबूत संघटन पराभवाला कारणीभूत ठरले. चेतन तुपे २ हजार ८२०, तर सुनील टिंगरे ४ हजार ९७५ मतांनी विजयी झाले.

नगरसेवक राजीनामे देणार का?

महापालिकेतील पाच पदाधिकाऱ्यांना आमदारपदाची लॉटरी लागली आहे. त्यामुळे हे नगरसेवक त्यांच्या पदाचा राजीनामा देणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. राजीनामा दिल्यास त्या जागांवर पोटनिवडणूक होईल. मात्र नगरसेवक राजीनामे देणार का, हा प्रश्न कायम आहे.

मिसाळ, तापकीर यांची हॅटट्रिक

पर्वती विधानसभा मतदारसंघातून माधुरी मिसाळ आणि खडकवासला मतदारसंघातून भीमराव तापकीर यांनी सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. माधुरी मिसाळ या २००९, २०१४ मध्ये निवडून आल्या होत्या. तर, २००९ मध्ये मनसेचे आमदार रमेश वांजळे यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत तापकीर प्रथम निवडून आले.