शिवसेना या चार अक्षरी शब्दात आक्रमकता हा शब्द दडला आहे. मात्र बाळासाहेब ठाकरे असतानाची शिवसेना आणि त्यांच्यानंतरची शिवसेना यामध्ये बऱ्याच अंशी फरक पडला आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं शिवधनुष्य अत्यंत लीलया पेललं आहे. मात्र त्याचवेळी शिवसैनिकांची मनं शांत करण्याचं आव्हानही त्यांना पेलावं लागतं आहे. अगदी त्यांनी राजकारणात प्रवेश केला तेव्हापासून त्यांच्याविरोधातला असंतोष खदखदतच राहिला आहे. राज ठाकरे, नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर उघड उघड आरोप करत शिवसेना सोडली. शिवसेनेचे दोन खंदे नेते शिवसेनेपासून वेगळे झाले. फाटाफूट, बंडखोरी झाली. त्यानंतरही उद्धव ठाकरेंसमोर आव्हान होतं ते मनं शांत करण्याचे. विधानसभा निवडणुकीच्या म्हणजेच आत्ताही त्यांच्यासमोर हेच आव्हान आहे. नाशिकमध्ये शिवसेनेच्या ३५० सदस्यांनी बंडखोरी केली. नाशिक पुण्यात शिवसेनेला जागा न दिली नाही हे सांगत राज ठाकरे रोज उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. अशात बंडखोर मनं, अशांत मनं शांत करण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहेच.

‘उद्धवा शांतवन कर जा’ अशी एक कविता दहावीत असताना होती. ज्यामध्ये भगवंतांनी उद्धवाला गोकुळात पाठवले होते. तिथे त्याच्यावर ही जबाबदारी प्रत्यक्ष श्रीकृष्णाने टाकली होती. मात्र शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर ही जबाबदारी आपसूकच येऊन पडली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही सख्खे चुलत भाऊ. उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंपेक्षा आठ वर्षांनी मोठे आहेत. मात्र राज ठाकरेंचा राजकीय अनुभव हा उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त आहे. तरीही उद्धव ठाकरे हे राज यांच्या तुलनेत मुरब्बी आणि सूज्ञ राजकारणी ठरले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना टिकवण्याचं आणि वाढवण्याचं आव्हान त्यांनी ज्याप्रकारे पेललं त्याला तोड नाही. उद्धव ठाकरेंना राजकारणात येऊन साधारण २ दशकं उलटली आहेत. त्याआधी त्यांचा छंद होता तो फोटोग्राफीचा. त्यांनी भरवलेलं गड किल्ल्यांच्या एरियल व्ह्यूने काढलेल्या फोटोंचं प्रदर्शन आजही मुंबईकरांच्या स्मारणात आहे.

बाळासाहेब ठाकरेंचा आक्रमक स्वभाव, तशी शैली त्यांच्या ठायी नाही. ते सगळे गुण घेतले राज ठाकरेंनी. शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांच्याभोवती बडवे आहेत त्यांना विरोध करुन राज ठाकरेंनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. त्याआधी २००६ मध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे कार्याध्यक्ष म्हणून घोषित केलं. यावरुन काहीसा वादही झाला, पण उद्धव ठाकरेंकडे हे पद आलं आणि तिथून त्यांच्यासमोर येणारी एक एक आव्हानं ते पेलत गेले, पेलत आहेत.

२०१४ मध्ये युती तुटली तेव्हा शिवसेना आणि भाजपा यांनी स्वबळ आजमावलं. त्यावेळी मोदी लाटेतही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आणले. मोदी लाट असताना त्यांनी दाखवलेली किमया दुर्लक्षित करण्यासारखी निश्चित नाही. उद्धव ठाकरे यांच्यावर कायम मवाळ नेता असा शिक्का बसला. याचं कारणही अगदीच साहजिक होतं ते म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा राजकीय वारसदार म्हणून कायम राज ठाकरेंकडेच पाहिलं गेलं. मात्र राज यांची घुसमट, पक्षात हळूहळू वाढणारं उद्धव ठाकरेंचं महत्त्व. बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरे सक्रिय राजकारणात उतरल्यानंतर त्यांना दिलेलं महत्त्व यामुळे राज ठाकरे कुठेतरी साईड ट्रॅक होत गेले. २००६ मध्ये त्यांनी पक्ष सोडला आणि त्यानंतर मनसेची म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा क्रमांक एकचा शत्रू हा शिवसेनाच होता किंबहुना आहे. माझ्या विठ्ठलावर माझी श्रद्धा आहे त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांवर नाही असं म्हणत राज ठाकरेंनी वेगळी चूल मांडली. मात्र उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेवर टीका करणे सोडले नाही. जी बाब राज ठाकरेंची तीच नारायण राणे यांचीही. नारायण राणे आता पक्के भाजपावासी झाले आहेत. मात्र उद्धव ठाकरेंना ही बाब मुळीच पटलेली नाही. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जेव्हा भाजपाला १२२ जागा मिळाल्या आणि शिवसेनेला ६३ जागा मिळाल्या तेव्हा सत्तेसाठी हे दोन पक्ष एकत्र येतीलच हे गृहीत धरलं जात होतं. शिवसेना कोणकोणती मंत्रिपदं मागणार याची चर्चा होत असतानाच शरद पवार यांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला आणि शिवसेनेची ‘बार्गेनिंग पावर’च खाऊन टाकली. पवारांच्या या खेळीमुळे उद्धव ठाकरेंची अवस्था पुन्हा पेचात पडल्यासारखी झाली. मात्र या परिस्थितीतूनही उद्धव यांनी मार्ग काढला. विरोधात राहण्यापेक्षा सत्तेत राहून विरोधकांची स्पेस खाऊ ही शांत निती त्यांनी अवलंबली आणि पुन्हा यशस्वीही करुन दाखवली.

१९९५ ला जेव्हा युती झाली होती तेव्हा राज्यात शिवसेना मोठा भाऊ आणि भाजपा लहान भाऊ असं समीकरण होतं. जे २०१४ नंतर बदललं कारण भाजपाच्या जागा जास्त होत्या. त्यामुळे भाजपा मोठ्या भावाच्या आणि शिवसेना धाकट्या भावाच्या भूमिकेत गेली. आता नकटं व्हावं पण धाकटं होऊ नये ही जी म्हण आहे त्याचा प्रत्यय शिवसेनेने पदोपदी घेतला. तरीही उद्धव ठाकरे शांत राहिले, त्यांची खेळी शांतपणे खेळत राहिले.

उद्धव ठाकरे जेव्हा राजकारणात आले तेव्हा ते राजकारणात अपरिपक्व आहेत अशीही टीका त्यांच्यावर झाली. मात्र उद्धव ठाकरेंनी स्वतःला राजकारणात अगदी मुरब्बीपणे मुरवलं ज्यामुळेच त्यांनी सत्तेत राहूनही कायम लक्ष केंद्रीत करण्यात यश मिळवलं. जोडीला ‘सामना’मधले अग्रलेख आणि मुलाखती होत्याच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख अफझल खानाची फौज, चौकीदार चोर है असा करुनही, भाजपावर टीका करुनही उद्धव ठाकरे त्यांच्यासोबतच राहिले.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपा आणि शिवसेनेने युती जाहीर केली. विधानसभेच्या वेळी सगळं काही समसमान असेल असं आमचं ठरलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे वारंवार सांगत राहिले. शेवटी शिवसेना १२४ आणि भाजपासह मित्रपक्ष १६४ असा फॉर्म्युला ठरला. त्यांच्यावर यावरुनही टीका झाली. मात्र त्यांचं हे धोरण यशस्वी ठरलं यात काही शंका नाही. ज्या पवारांनी उद्धव ठाकरेंची कोंडी केली होती, त्याच राष्ट्रवादीतली माणसं शिवसेनेने फोडली. निवडणूक आल्यावर डाव आणि पेच कसे असतात हेदेखील त्यांनी दाखवून दिलं. त्यामुळे एकेकाळी त्यांच्या शैलीवर होणारी टीका, त्यांना परिपक्व न मानणं हे सगळं आपसूकच मागे पडलं. असं सगळं असलं तरीही बंडखोर मनं शांत करण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंपुढे आहे. त्यातही ते यशस्वी होतील यात शंका वाटत नाही.

समीर जावळे

sameer.jawale@indianexpress.com