विधानसभेबरोबरच सातारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी ही माजी खासदार उदयनराजे भोसले यांची इच्छा निवडणूक आयोगाने काही पूर्ण केलेली नाही. उदयनराजे यांना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

भाजपमध्ये प्रवेश करताना सातारा मतदारसंघात विधानसभेबरोबर पोटनिवडणूक व्हावी, अशी उदयनराजे यांची अट होती. यासाठी भाजपच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे शब्द टाकावा, अशी त्यांनी विनंतीही केली होती. याप्रमाणेच भाजपच्या नेत्यांनी उदयनराजे यांना तसे आश्वासन दिले. गेल्या शनिवारी उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तत्पूर्वी शुक्रवारी रात्री उशिरा त्यांनी खासदारकीचा राजीनामा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निवासस्थानी जाऊन सादर केला होता.

विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यात सातारा लोकसभा मतदारंसघातील पोटनिवडणुकीचा समावेश नव्हता. याबाबत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील आरोरा यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी महाराष्ट्र विधानसभेबरोबर २१ ऑक्टोबरला सातारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार नाही, असे स्पष्ट केले. याचा अर्थ विधानसभेची निवडणूक पार पडल्यावरच सातारा मतदारसंघात पोटनिवडणूक होऊ शकते.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या वेळी खुर्चीवर बसण्यावरून उदयनराजे यांनी थयथयाट केला होता. तसेच राष्ट्रवादीमध्ये ते कोणालाच जुमानत नसत. भाजपमध्ये उदयनराजे यांचे चोचले पुरविले जातील का, हा  प्रश्न उपस्थित केला जातो. नाशिकच्या सभेत उदयनराजे यांना महत्त्व देण्यात आले होते. सुधीर मुनगंटीवार, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आदींना कोपऱ्यात जागा देण्यात आली. उदनराजे यांना  मोदी यांच्या जवळ आसनव्यवस्था करण्यात आली होती.

पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नसल्याने उदयनराजे यांचा हिरमोड झाला असणार. राष्ट्रवादीप्रमाणे उदयनराजे यांना ‘हम करोसे’प्रमाणे वागता येणार नाही. यातच विधानसभेनंतर पुन्हा पोटनिवडणुकीला सामोरे जाण्याचे दिव्य  पार पाडावे लागेल.

अंतर्गत राजकारणाचा फटका

सातारा लोकसभा मतदारसंघात विधानसभेबरोबरच पोटनिवडणूक होईल, असे आश्वासन गेल्या आठवडय़ात भाजपच्या नेत्यांनी उदयनराजे यांना दिले होते. पण उदयनराजे यांच्या पक्ष प्रवेशावरून भाजपमध्येच अंतर्गत बरीच धुसफूस झाल्याचे समजते. उदयनराजे यांच्या पक्ष प्रवेशासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जास्त आग्रही होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी वेगळी भूमिका मांडली होती. हा विषय शेवटी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या पातळीवर गेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाच्या पक्ष प्रवेशामुळे वेगळा संदेश जाईल व त्याचा फायदा होईल, असा युक्तिवाद करण्यात आला होता. उदयनराजे यांचा विधानसभा निवडणुकीत वापर करून घ्यावा, अशी चर्चा मग पक्षात झाली. यातूनच सातारा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून पाठपुरावा झाला नाही, असेही सांगण्यात आले.