विधानसभा निवडणुकीच्या अगोदर शिवसेना-भाजपामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीसह अन्य पक्षांमधील अनेक नेत्यांनी प्रवेश केलेला आहे. या पार्श्वभूमीवर एकाच मतदारसंघात अनेकजण इच्छुक राहणार असल्याची अगोदरच शक्यता निर्माण झाली होती. त्यानुसार आता महायुतीच्या अधिकृत उमेदवारांसमोर बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांचे आव्हान निर्माण झाले आहे. सांगली व जत येथे महायुतीच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी उफाळून आली आहे.

सांगलीत काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्यावतीने पृथ्वीराज पाटील यांनी शहारतून अर्ज दाखल केला. तर भाजप-सेना महायुतीकडून आमदार सुधीर गाडगीळ यांनी अर्ज दाखल केलेला आहे. मात्र असे असताना त्यांच्याविरोधात भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य शिवाजी डोंगरे व शिवसेनेचे शेखर माने यांनी बंडखोरी करत शुक्रवारी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. तर जतमध्ये महायुतीच्यावतीने आमदार विलासराव जगताप यांना उमेदवारी दिलेली असताना त्यांच्याविरोधात भाजपाचे नेते डॉ.रविंद्र आरळी यांनी बंडखोरी केली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी काल (शुक्रवार) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. राज्यभरात विविध पक्षांच्या अधिकृत उमेदवारांनी काल दुपारपर्यंत अर्ज दाखल केले. याचबरोबर अपक्ष व बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांनी देखील अर्ज दाखल केले आहेत. अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख ७ ऑक्टोबर असून पक्षातील अधिकृत उमेदवारांसमोर आता या बंडखोर उमेदवारांचे बंड थंड करण्याचे आव्हान आहे. यासाठी पक्षाकडून देखील व्यूहरचना केली जात आहे. शिवाय काल संध्याकाळी मुख्यमंत्री फडणवीस व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकारपरिषदेद्वारे बंडखोरांना माघार घेण्याचा अप्रत्यक्ष इशाराही दिलेला आहे.