मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा दावा

नागपूर : जागतिक आर्थिक मंदीचा परिणाम देशावर होत असला तरी त्यातून छत्तीसगडने मार्ग काढला आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन आणि २० लाख शेतकऱ्यांकडून अडीच हजार रुपयांप्रमाणे धान खरेदी केल्याने आमच्या राज्यातील बाजारात मंदी नाही, असा दावा छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केला.

निवडणुकीच्या प्रचारासाठी ते सोमवारी नागपुरात प्रेस क्लब येथे बोलत होते. काँग्रेस आणि भाजपमधील आर्थिक धोरण राबवण्यातील फरक सांगताना बघेल म्हणाले, काँग्रेस शेतकरी, कामगारांचा विचार करते तर भाजप केवळ बडय़ा उद्योजकांचा विचार करते. त्यांनी रिझव्‍‌र्ह बँकेतून कोटय़वधी रुपये काढून निवडक उद्योजकांना दिले. आता हेच उद्योजक तो पैसा सरकारी कंपन्या, रेल्वे खरेदी करण्यासाठी वापरत असल्याची शंका आहे. छत्तीसगडमध्ये आमचे बहुमताचे सरकार आले तेव्हा सर्वप्रथम शेतकऱ्यांचे १० हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. निवडणूक जाहीरनाम्याप्रमाणे १६५० रुपये प्रतिक्विंटलऐवजी अडीच हजार रुपयांप्रमाणे २० हजार कोटी रुपयांचे धान खरेदी केले. शेतकऱ्यांच्या खिशात पैसा गेला. हा पैसा शेतकऱ्याने खर्च केल्याने तो बाजारात आला. गेल्यावर्षी जून ते सप्टेंबर या तिमाहीत गृह, भूखंड नोंदणीतून (रजिस्ट्री) राज्य सरकारला ९२ कोटींचा महसूल मिळाला होता. यावर्षी त्याच तिमाहीत १७२ कोटी मिळाले. देशात ऑटोमोबाइल क्षेत्रात १९ टक्केघट आहे. आमच्या राज्यात ११ टक्के वृद्धी आहे. सोन्या-चांदीची विक्री ८४ टक्के वाढली आहे. राज्यात कृषी दर ४ टक्के आहे. डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना जगात  मंदी आली होती. तेव्हा त्यांनी मनरेगाच्या माध्यमातून कामगारांच्या खात्यात पैसे टाकले. परिणामी,  देश आर्थिक मंदीतून बाहेर आला. हेच काम आम्ही छत्तीसगडमध्ये केले. २० लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे टाकण्यात आले. त्यामुळे बाजारात मंदीचा परिणाम नाही.