18 October 2019

News Flash

मुख्यमंत्र्यांनी दगा दिला

२०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने ओमी कलानींना जवळ करत त्यांच्या समर्थकांना कमळाच्या चिन्हावर पालिका निवडणुकीत उतरवले.

ज्योती कलानी यांचा आरोप

महापालिका निवडणुकीत भाजपची साथ धरल्याने विधानसभा निवडणुकीतही कलानी कुटुंबीयांपैकी एकाला उमेदवारी दिली जाईल, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही ऐन वेळी दगा दिला, असा खळबळजनक आरोप उल्हासनगरच्या विद्यमान आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार ज्योती कलानी यांनी पत्रकारांशी बोलताना केला. भाजपने दगा दिल्यामुळे कलानी समर्थकांमध्ये अन्यायाची भावना असून ते भाजपला धडा शिकवतील, असेही त्या म्हणाल्या.

२०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने ओमी कलानींना जवळ करत त्यांच्या समर्थकांना कमळाच्या चिन्हावर पालिका निवडणुकीत उतरवले. त्यामुळे एरवी दोन आकडी नगरसेवकांची संख्या गाठण्यात अपयशी ठरणाऱ्या भाजपला थेट ३२ जागांवर विजय मिळवता आला. तसेच महापालिकेत महापौर बसवण्यात भाजपला यश आले. त्यामुळे कलानी यांचीही भाजपमधील ताकद वाढली. याचाच फायदा घेत ओमी कलानींनी भाजपच्या विधानसभेच्या तिकिटावर दावा केला. हा दावा अधिक प्रखरपणे दिसावा म्हणून गेल्या अनेक दशकांपासून राष्ट्रवादी काँग्रेसशी असलेले नाते आमदार ज्योती कलानी यांनी तोडले. असे असताना भाजपने ऐन वेळी कुमार आयलानी यांना उमेदवारी देत कलानी कुटुंबाला धक्का दिला. याविषयी पत्रकारांशी बोलताना ज्योती कलानी यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर तोंडसुख घेतले.

भाजपने दगा दिल्याची खंत ज्योती कलानी यांनी बोलून दाखवली. मुख्यमंत्र्यांनी ओमी कलानी आणि कलानी कुटुंबाला दिलेला शब्द पाळला नाही. महापौर पंचम कलानी यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते, मात्र त्यानंतरही तिकीट दुसऱ्याच व्यक्तीला दिल्याने आमची राजकीय अडचण करण्याचा प्रयत्न केला. भाजपने कलानींवर अन्याय केल्याची भावना जोर धरत असून विकासावर पुन्हा निवडणूक जिंकू असा विश्वासही ज्योती कलानी यांनी व्यक्त केला आहे.

First Published on October 10, 2019 2:14 am

Web Title: cm devendra fadnavis akp 94