राष्ट्रपती राजवटीनंतरही बहुमत सिद्ध करू. काँग्रेस नेत्यांची आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत आयोजित केलेली बैठत रद्द करण्यात आली असल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी दिली. निवडणुकीचे निकाल लागून तीन आठवड्यांचा कालावधी उलटला असला तरी राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यातच राज्याची वाटचाल आता राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने सुरू असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

शरद पवार यांची काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा झाली आहे. आज काँग्रेस नेते चर्चेसाठी मुंबईत येणार नाहीत. २ दिवसांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती माणिकराव ठाकरे यांनी दिली. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. “आज राज्यपातळीवरील नेते राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा करतील. राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आलेल्या मुदतीपूर्वी कोणताही निर्णय न झाल्यास राज्यपाल काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बोलावतील. आम्हाला आणखी एक-दोन दिवस चर्चा करायची आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली तरी त्यानंतरही आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू शकतो,” असंही ते म्हणाले.

“सर्वधर्म समभाव ही आमची विचारसरणी आहे. कोणत्याही पक्षाला पाठींबा द्यायचा जरी झाला तरी आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. शिवसेनेची स्वत:ची वेगळी विचारसरणी आहे. आम्ही कोणत्याही धर्मात तेढ निर्माण होणार नाही याकडे प्रामुख्यानं लक्ष देऊ. राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल हे नक्की,” असं ठाकरे यावेळी म्हणाले. “आज दिल्लीतील नेते मुंबईत चर्चेसाठी येणार होते. परंतु शरद पवारांनी दोन तीन दिवसांनी चर्चा करू असं म्हटलं. त्यामुळे दिल्लीवरून येणारे नेते आज मुंबईत येणार नाहीत. राज्यातील नेते आज चर्चा करतील. राज्य स्तरावर आजच चर्चा होईल. सर्व गोष्टींचा या बैठकीत विचार केला जाईल. राज्यात जे काही अंतिम निर्णय होतील, त्यासाठी पक्षश्रेष्ठींची मान्यता घ्यावीच लागेल,” असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.