वेध विधानसभा / परभणी /आसाराम लोमटे

आपापल्या राजकीय पक्षात राहूनही एकमेकांना मदत करण्याचे जे ‘प्रासंगिक करार’ जिल्ह्य़ातील ठरावीक मातब्बर नेत्यांकडून पाळले जातात. त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालांवर होत असतो. लोकसभेपाठोपाठ आलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये  ही पक्षनिरपेक्ष मदत काहींना दिलासा देणारी तर काहींना अडचणीत आणणारी ठरू शकते. विशेषत: पाथरी आणि जिंतूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघात हे समीकरण अधिक प्रभावी ठरण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीत युती होणार की नाही यावरही काहींचे घोडे अडले आहे. तरीही शिवसेना- भाजपचे आव्हान जिल्ह्य़ात चारही विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस- राष्ट्रवादीपुढे आहे. जिल्ह्य़ात युतीत एकवाक्यता नाही आणि राष्ट्रवादीत गटबाजीची लागण अशी परिस्थिती आहे.

येणारी विधानसभा निवडणूक अनेक अर्थाने वैशिष्टय़पूर्ण आहे. सुरेश वरपुडकर आणि रामप्रसाद बोर्डीकर हे जिल्ह्य़ातले एकेकाळचे मातब्बर नेते यंदा पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात राहणार आहेत. तीन दशके जिल्ह्य़ाच्या राजकारणात केंद्रस्थानी राहिल्यानंतर आता गेल्या काही वर्षांपासून दोघेही सक्रिय सत्तेच्या प्रवाहाबाहेर आहेत. वरपुडकर पाथरी मतदारसंघातून तर बोर्डीकर जिंतूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. दोघांचीही मोच्रेबांधणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. या दोघांचेही विधानसभेत पुनरागमन होणार की नाही याचा फैसला ठरवणारी ही निवडणूक आहे.

परभणी विधानसभा मतदारसंघ गेल्या तीन दशकांपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. शिवसेनेचा सामना करताना काँग्रेस पक्षाने आजवर अनेक प्रयोग केले मात्र काँग्रेसला सेनेचा हा बालेकिल्ला भेदता आला नाही. काँग्रेसने मुस्लीम उमेदवार दिल्यानंतर जे धार्मिक ध्रुवीकरण होते तेव्हा शिवसेनेच्यावतीने ‘खान हवा की बाण’ असा प्रचार केला जातो. या प्रचाराला रोखण्यासाठी काँग्रेसने िहदू उमेदवारही दिले, पण निवडणुकीच्या िरगणात एखादा प्रभावी मुस्लीम उमेदवार उभा करण्याची खेळी अनेकदा शिवसेनेकडूनही होते. गेल्या निवडणुकीत सेना-भाजपचे उमेदवार स्वतंत्र लढले तरी शिवसेनेने आपला बालेकिल्ला राखला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आ. डॉ. राहुल पाटील यांनी विविध कार्यक्रम-उपक्रमांचा धडाका लावला आहे. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे हेही मागच्या पराभवानंतर सतत कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमांच्या माध्यमातून सक्रिय आहेत. जर युती झाली तर भरोसे कोणता पर्याय निवडतील हे पाहणे औत्सुक्याचे आहे. या विधानसभा निवडणुकीत वंचितची उमेदवारी निर्णायक राहणार आहे. तूर्त तरी मुस्लीम समाजाला वंचितची उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत.

पाथरी विधानसभा मतदारसंघात आमदार मोहन फड यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर, शिवसेनेतील काही इच्छुक तयारीला लागले आहेत. युतीत हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे मात्र गेल्या वेळी अपक्ष म्हणून निवडून आलेल्या आ. मोहन फड यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने विद्यमान आमदार म्हणून त्यांनाच उमेदवारी  मिळाली तर सेनेला या मतदारसंघावरचा आपला हक्क सोडावा लागणार आहे. वंचित बहुजन आघाडीची या मतदारसंघातील उमेदवारी कोणाला मिळणार याबाबतही उत्सुकता आहे. काँग्रेसच्या वरपुडकरांना पाथरी मतदारसंघात राष्ट्रवादीची मदत मिळण्याची शक्यता कमी आहे. मात्र वरपुडकरांना पक्षनिरपेक्ष मदतीची अपेक्षा आहे. दुसरीकडे शिवसेनेकडून ऐन निवडणुकीच्या तोंडावर काही इच्छुक तयारीला लागले आहेत. अशा आयातांना उमेदवारी नको असा आग्रह शिवसैनिक करीत आहेत. लोकसभा निवडणुकीत ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले अशांना विधानसभा निवडणुकीत बळ देण्याचा प्रयत्न खासदार संजय जाधव यांच्याकडून राहील. जिल्ह्य़ातल्या चारही विधानसभा मतदारसंघांत हा परतफेडीचा प्रयोग लक्षणीय राहणार आहे.

गंगाखेड विधानसभा मतदारसंघात विद्यमान आ. डॉ. मधुसूदन केंद्रे यांच्यासह माजी आमदार सीताराम घनदाट, संतोष मुरकुटे, रत्नाकर गुट्टे असे अनेक उमेदवार प्रयत्नशील आहेत. ‘गंगाखेड शुगर्स घोटाळा’प्रकरणी गुट्टे सध्या तुरुंगात आहेत तरी कार्यकर्त्यांनी मात्र त्यांचा वाढदिवस जोरात साजरा केला. रासपच्या गुट्टे यांच्या अडचणी वाढल्याने गंगाखेडची जागा  सोडवून घेण्यासाठी भाजपच्या इच्छुकांनी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. गणेश रोकडे, रमेश गोळेगावकर, बालाजी देसाई, बाबासाहेब जामगे, विठ्ठल रबदडे, रामकिशन  रौंदळे, सुभाष कदम असे अनेक इच्छुक भाजपमध्ये आहेत. युती तुटल्यास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम हेही प्रयत्नात आहेत. या मतदारसंघात ‘ओबीसी’ मतदारांची संख्या लक्षणीय असल्याने वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार ‘ओबीसी’चा असेल.

जिंतूर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आ. विजय भांबळे व माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्यातील पारंपरिक सत्तासंघर्ष पुन्हा पाहायला मिळणार आहे. बोर्डीकरांनी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारीसाठी मोच्रेबांधणी चालवली आहे. शिवसेनेचे राम पाटील हेही गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत आहेत. गेल्या निवडणुकीत सेना-भाजपची युती तुटली होती. त्यामुळे जिल्ह्य़ातल्या चारही विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजपची इच्छुक मंडळी स्वबळाच्या तयारीत आहेत.

युती झालीच तर काहींना आपल्या महत्त्वाकांक्षेला मुरड घालावी लागेल तर काहींना नवे पर्याय धुंडाळावे लागतील. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची मोच्रेबांधणी एक वेळ समजून घेता येईल, पण गंगाखेड विधानसभा मतदारसंघात तर अनेकांचे राजकीय पक्ष अजून ठरायचे आहेत.

चारही विधानसभा मतदारसंघात चक्क निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर अकस्मात अवतरलेल्या इच्छुकांची संख्याही मोठी आहे. केवळ पशाच्या जोरावर निवडणूक लढविण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या धनवंतांची ही ‘एंट्री’ आश्चर्यकारक आहे. प्रस्थापित विरुद्ध नवे असेही पर्याय मतदारांसमोर आहेत. यातला ते कोणता निवडतात हे कळेलच, पण राजकीयदृष्टय़ा चारही मतदारसंघातले वातावरण तापले आहे.

परभणी जिल्हा

सध्याचे पक्षीय बलाबल

परभणी :- शिवसेना</p>

गंगाखेड :- राष्ट्रवादी

पाथरी :- भारतीय जनता पक्ष

जिंतूर :- राष्ट्रवादी

युती तुटली तरीही आम्ही समर्थ!

केंद्र व राज्य सरकारने थेट लाभार्थ्यांपर्यंत अनेक योजनांचा लाभ पोहोचवला आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील विधानसभेच्या चारही जागा युतीच्या ताब्यात येतील यात शंका नाही. समजा युती झाली नाही आणि आम्ही स्वतंत्र लढलो तरीही भाजपची ताकद जिल्ह्य़ात अव्वलस्थानी असलेली दिसेल. नुकत्याच पार पडलेल्या मानवत नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत भाजपने विक्रमी मते प्राप्त करून विजय संपादन केला याचा अर्थ कमळाचे चिन्ह आता तळागाळापर्यंत पोहोचले आहे.

– अभय चाटे, जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष

आमची वजाबाकी होणार नाही

विधानसभा निवडणुकीत जर युती तुटली तर त्याचा आम्हाला निश्चितपणे फायदा होईल. गंगाखेड आणि जिंतूर या दोन्ही विधानसभांवर राष्ट्रवादीचे आमदार आहेत. या दोन्ही जागा आमच्या ताब्यात राहतील. या वेळी पाथरीच्या जागेवरही आम्ही निर्विवाद वर्चस्व राखू. परभणीत मात्र मतांची समीकरणे विचित्र असल्याने काँग्रेसला जागा राखता येईल असे वाटत नाही. एकूण या विधानसभा निवडणुकीत आमची ताकद कायम राहील त्यात वजाबाकी होणार नाही.

– आ. बाबाजानी दुर्राणी, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस