काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची नवी दिल्लीमधील बैठक संपली असून यावेळी सर्व मुद्द्यांवर आपलं एकमत झालं असल्याची माहिती काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. बैठकीनंतर राष्ट्रवादी नेते नवाब मलिक आणि पृथ्वीराज चव्हाण यांची एकत्रित पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्या मुंबईत निवडणुकीच्या आधी आघाडीत असणाऱ्या घटकपक्षांशी चर्चा करुन त्यांना माहिती देणार असल्याचं सांगितलं.

“महाराष्ट्रात पर्यायी सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सर्व मुदुद्यांवर चर्चा पूर्ण झाली असून एकमत झालं आहे. दोन्ही पक्षांमधील नेत्यांमध्ये एकवाक्यता आहे. उद्या आम्ही मुंबईला जाणार असून तिथे निवडणुकीच्या आधी आघाडीसोबत होते त्या मित्रपक्षांशी चर्चा करणार आहोत. त्यांना आमच्यात झालेल्या चर्चेची माहिती देणार आहोत,” अशी माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.

मित्रपक्षांशी चर्चा केल्यानंतर आपले नेते पुन्हा एकदा शिवसेनेसोबत चर्चा करणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. तसंच तिन्ही पक्षांमध्ये सगळ्या मुद्द्यांवर सहमती झाल्यानंतर एकत्रित मुंबईत माहिती देऊ असंही त्यांनी म्हटलं. मुख्यमंत्रिपद तसंच मंत्रीमंडळ वाटपाबाबत कोणताही निर्णय अद्याप झाला नसल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. “जेव्हा आम्ही समान किमान कार्यक्रम घोषित करु तेव्हाच सत्तेत कोणाला किती वाटा मिळणार आहे याची माहिती देऊ,” असं पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगितलं.