महाराष्ट्रात वेगवान गतीने राजकीय घडामोडी घडत असून काँग्रेस शिवसेनेला महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देणार ? हा प्रश्न आहे. काँग्रेस शिवसेनेला बाहेरुन पाठिंबा देणार ? की, सरकारमध्ये सहभागी होणार ते अजून स्पष्ट झालेले नाही. राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी आधीपासून तयार होती. पण काँग्रेसच्या निर्णयावर सर्व काही अवलंबून आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे त्रिशंकू सरकार अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. खरंतर काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही भिन्न विचारधारेचे पक्ष आहेत. पण फक्त भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी म्हणून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये एकवाक्यता होऊ शकते. काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय अनेकांना विचित्र वाटू शकतो. पण शिवसेनेने याआधी दोन वेळा काँग्रेसला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पाठिंबा दिला होता.

२००७ साली राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या उमेदवार प्रतिभा पाटील यांना मराठीच्या मुद्दावरुन शिवसेनेने पाठिंबा दिला होता. त्यावेळी भैरोसिंह शेखावत भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार होते. त्यानंतर २०१२ साली सुद्धा शिवसेनेने राष्ट्रपतीपदाच्याच निवडणुकीत भाजपाला न जुमानता प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता. आज महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी काँग्रेसने त्याच पाठिंब्याची परतफेड केली असे म्हणावे लागेल.