नागपूर : शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न अधिक गंभीर असलेल्या विदर्भात विद्यमान कृषीमंत्र्यांनाचाच पराभव झाल्याने महायुतीला जबर धक्का बसला आहे.

शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी आणि शेतकऱ्यांशी संबंधित इतरही प्रश्नांचा मुद्यांवर विरोधकांनी प्रचारा दरम्यान  सरकारच्या विरोधात राण उठवल्याने महायुतीला या भागात २०१४ चे संख्याबळ गाठताना चांगलीच दमछाक झाली.

विदर्भातील यवतमाळ, अमरावती, वर्धा, अकोला, वाशीम आणि बुलढाणा हे सहा जिल्हे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे प्रकाशझोतात आले आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपने स्थानिक प्रश्नाला महत्त्व न देता ३७० कलम रद्द करण्याचा मुद्या प्रचारात प्रामुख्याने राबवला. दुसरीकडे विरोधी पक्षाने शेतकरी आत्महत्या आणि फसलेली कर्जमाफी हे मुद्ये प्रचारात लावून धरले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आत्महत्या सर्वाधिक असलेल्या यवतमाळ जिल्ह्य़ात महायुतीला मागचेच (सात पैकी सहा)संख्याबळ कसेबसे टिकवता आले. अमरावती जिल्ह्य़ात आठ पैकी फक्त एक जागा महायुतीला मिळाली. राज्याचे कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे हे मोर्शी मतदारसंघातून पराभूत झाले. त्यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनचे देवेंद्र भुयार यांनी पराभव केला. अकोला जिल्ह्य़ातही पाचपैकी सर्व जागा. बुलढाणा जिल्ह्य़ात सातपैकी पाच, वाशीममध्ये तीन पैकी दोन, वर्धा जिल्ह्य़ात चार पैकी तीन जागा महायुतीने जिंकल्या.

यासंदर्भात शेतकरी नेते राम नेवले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ज्या भागात विरोधी पक्षाचा उमेदवार सक्षम होता तेथे शेतकऱ्यांनी त्याला पसंती दिली. या निवडणुकीत भाजपच्या विदर्भात कमी झालेल्या जागा या शेतकरी नाराजीचाच फटका आहे.