राज्यात सत्ता आल्यानंतर देवेंद्र फडणवीसच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असे सुतोवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहेत. दिल्लीत आपण नरेंद्रला पुन्हा बसवले त्याचप्रमाणे देवेंद्रलाही महाराष्ट्रात पुन्हा बसवा, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. रायगड जिल्ह्यातील खारघर येथे महायुतीच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

मोदी म्हणाले, दिल्लीत आपण नरेंद्रला पुन्हा बसवले आता त्याच ताकदीने महाराष्ट्रात देवेंद्रला देखील पुन्हा बसवा. दिल्लीत नरेंद्र आणि मुंबईत देवेंद्र. हा नरेंद्र, देवेंद्रचा फॉर्म्युला गेल्या पाच वर्षात सुपरहिट राहिला आहे. आपण हे पण लक्षात ठेवा जेव्हा नरेंद्र आणि देवेंद्र सोबत उभे राहतात तेव्हा ते एक अधिक एक दोन होत नाहीत तर एकावर एक अकरा होतात. येणाऱ्या वर्षात हा फॉर्म्युला महाराष्ट्राला विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचवणार आहे.

२०१४ पूर्वी मुंबई आणि परिसरात रिअल इस्टेट क्षेत्रात अंडरवर्ल्ड आणि बिल्डर माफियांचे संबंध होते, अनेक गोष्टी त्यावेळी घडल्या. त्याचे पडलेले डाग काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आजवर धुऊन काढता आलेले नाहीत.

शेतकऱ्यांच्या जमिनी हडपणाऱ्या आणि गरीबांच्या घराची स्वप्ने उद्ध्वस्त करणाऱ्या लँड माफियांना संपवण्याचा प्रयत्न गेल्या पाच वर्षात झाला. पूर्वी नेत्यांच्या संगनमतातून बिल्डर माफियांची मनमर्जी चालायची. रिअल इस्टेट हे क्षेत्र भ्रष्टाचाराच पैसा खपवण्याचे माध्यम बनले होते, अशा शब्दांत मोदींनी यावेळी आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले.