“साहेब, कृपया आमच्यावर आत्महत्येची वेळ येऊ देऊ नका”, अशी आर्त विनंती खुद्द शिवसैनिकांनीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. जालन्यातील या शिवसैनिकांनी आपल्या रक्ताने पत्र लिहून याद्वारे पक्षश्रेष्ठींकडे आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

जालन्यातील काही शिवसैनिकांनी आपल्या रक्ताने उद्धव ठाकरेंना पत्र लिहीले आहे. यावर मन्सूर शेख, विवेक ढाकणे आणि काकासाहेब कोल्हे या शिवसैनिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यांनी आपलं म्हणणं उद्धव ठाकरेंसमोर मांडताना म्हटलं की, “जालन्यातील घनसांगवी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार डॉ. हिकमत उढाण यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. उढाण हे गेल्या २५ वर्षांपासून तालुक्यात शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. मात्र, त्यांचा दोनदा पराभव झाला त्यामुळे हा संघर्ष आता कुठपर्यंत सुरु ठेवायचा. कारण, आमच्या बापाचं आयुष्यही यात गेलं आता आमचही यातचं चाललं आहे.”

“डॉ. उढाण यांना १ लाख ४ हजार ४४५ मतं मिळाली, ही मतं देणारे मतदार आजही उढाण यांना आपल्या मनातील आमदार मानतात. इतकी वर्षे संघर्ष करुनही शिवसेनेचा इथं पराभव झाला आहे. त्यामुळे जर आता तालुक्यात पक्षाचे अस्तित्व टिकवायचे असेल आणि २०२४ ला आव्हान म्हणून उभं रहायचं असेल तर येणाऱ्या मंत्रिमंडळात उढाण यांचा मंत्रीपदासाठी विचार व्हावा, हीच विनंती. कृपया आमच्यावर आत्महत्येची वेळ येऊ देऊ नका”, अशी कळकळीची विनंती शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंकडे केली आहे.

दरम्यान, शिवसैनिकांनी आपल्यासाठी उद्धव ठाकरेंना रक्ताने पत्र लिहिल्यानंतर हिकमत उढाण यांनी फेसबुकवरुन प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, “माझ्यासाठी हा खूपच भावनिक क्षण आहे. माझ्या पराभवाने असंख्य लोक रडले, तुमचं प्रेम बघून मी पण खूप रडलो. माझ्या पराभवाचं मला दुःख नाही, पण तुमच्या दुःखाचं मला दुःख आहे. काही जणांनी मातोश्रीला रक्तान पत्र लिहिलं की, मला एमएलसी करा. पण माझी भूमिका स्पष्ट आहे, मी पदासाठी राजकारण करत नाही. उध्दव साहेब माझे देव आहेत. त्यांना काही मागू नका, टायगर अभीभी जिंदा है. बचेंगे तो और भी लडेंगे. जिना यहा मरना यहा, इसके सिवा जाना कहा आणि मेलो तरी मॅनेज होणार नाही.”