मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपाने पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली आहे. रोहिणी खडसे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शक्तीप्रदर्शन केलं. त्यापूर्वी बोलताना एकनाथ खडसे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी खडसे म्हणाले,”चाळीस वर्षांपासून पक्ष देईल तो निर्णय मान्य आहे. पक्षाने जो आदेश दिला त्याचं पालन केलं. पक्षासाठी काही कटू निर्णयही स्वीकारले,” असे सांगत “मला जे प्रेम दिले तेच रोहिणी खडसे यांना द्या,” असे आवाहन खडसे यांनी कार्यकर्त्यांना केले.

भाजपाने रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली. रोहिणी खडसे या थोड्या वेळात अर्ज दाखल करणार आहे. त्यापूर्वी रॅली काढून त्यांनी शक्तीप्रदर्शन केलं. रॅली काढण्यापूर्वी एकनाथ खडसे यांनी पक्ष कार्यकर्ते आणि समर्थकांशी संवाद साधला. ते म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून आपल्या मतदारसंघामध्ये भाजपाचा उमेदवार कोण असेल, याबद्दल सगळ्यांना उत्सुकता होती. गेल्या तीस वर्षांपासून तुम्ही मला निवडून दिलं. तुम्हा सगळ्यांनी सहकार्य केलं. पक्षाने जो आदेश दिला. त्या आदेशाचं पालन केलं. आपला पक्ष डळमळीत होऊ नये म्हणून काही कटू निर्णयही स्वीकारले. पक्ष बदनाम होईल असं काम केलं नाही. एका मिनिटात मंत्रीपद सोडलं,” असं ते म्हणाले.

रोहिणी खडसे यांच्या उमेदवारीविषयी बोलताना खडसे म्हणाले,”रोहिणी खडसेंना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. त्याला विलंब लागला तरी चांगला निर्णय घेतला आहे. घरातसुद्धा अडचणी असतात. हा तर पक्ष आहे आणि तिथे अडचणी असणारच. पण, तुमचं म्हणणं मी पक्ष श्रेष्ठींपर्यत पोहोचवले आहे. पक्षाच्या निर्णय आपल्या हिताचा आहे. माझी मुलगी म्हणून नाही. तर पक्षाची कार्यकर्ता म्हणून तिला विजयी करण्यासाठी काम करायचं आहे. मला जे प्रेम दिलं तेच रोहिणी खडसेंनाही मिळेल. एकजुटीने आणि एकदिलाने रोहिणी खडसे यांना सहकार्य करून भाजपाला विजयी करा,” असं आवाहन खडसे यांनी केलं. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती.