संतोष प्रधान

अजित पवार यांच्या आमदारकीच्या राजीनाम्यामुळे पवार कुटुंबीयांमधील गृहकलह पुन्हा चर्चेत आला असला, तरी देशातील काही प्रमुख नेतेमंडळींनी सत्ता आपल्याकडेच राहावी म्हणून घरातील अनेकांना राजकारणात पुढे आणले आणि राजकीय महत्त्वाकांक्षेतून राजकीय वारसांमध्येच स्पर्धा सुरू झाली व वाद चव्हाटय़ावर आले.

शरद पवार यांच्या कुटुंबातील चौघे राजकारणात सक्रिय झाले आहेत. अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यानंतर पुढील पिढीतील पार्थ पवार आणि रोहित पवार यांचीही राजकीय महत्त्वाकांक्षा बळावली. पार्थ पवार यांनी लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून नशीब अजमावले, पण त्यात ते अयशस्वी ठरले. रोहित पवार हे आता कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. अजितदादांची नाराजी दूर करण्याकरिता शरद पवार यांना कुटुंबीयांची शनिवारी बैठक घ्यावी लागली.

महाराष्ट्राबरोबरच विधानसभेची निवडणूक होणाऱ्या हरयाणामध्येही गृहकलहातून भारतीय लोकदलात फूट पडली आहे. माजी उपपंतप्रधान देवीलाल यांच्या चौथ्या पिढीत सध्या संघर्ष सुरू आहे. देवीलाल यांचे पुत्र ओमप्रकाश चौताला यांचे पुत्र अजय आणि अभय यांच्यात पक्षाची सूत्रे कोणाकडे असावीत यातून वाद झाला. आजोबा ओमप्रकाश चौताला यांनी नातू दुष्यंत याची पक्षातून हकालपट्टी केल्यावर लोकदलात फूट पडून दुष्यंत यांनी नव्या पक्षाची स्थापना केली. विधानसभा निवडणुकीत लोकदलातील दोन गट परस्परांच्या विरोधात उतरणार आहेत.

माजी पंतप्रधान आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे देवेगौडा, समाजवादी पक्षाचे मुलायमसिंग यादव, अकाली दलाचे प्रकाशसिंग बादल, द्रमुकचे करुणानिधी, तेलुगू देशमचे संस्थापक एन टी रामाराव आदी नेत्यांनी मुले, नातवंडे, जावई, पुतणे, भाचे आदींना निवडणुकीच्या राजकारणात पुढे आणले. प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा वाढली. यातूनच वाद समोर आले. देवेगौडा यांना नातवाचा हट्ट पूर्ण करण्याकरिता लोकसभेचा पारंपरिक मतदारसंघ नातवासाठी सोडावा लागला. यात स्वत: देवेगौडा आणि नातू हे दोघेही पराभूत झाले. मुलायमसिंग यादव यांचा भाऊ आणि पुत्र अखिलेश यांच्यात संघर्ष झाला. करुणानिधी यांची दोन मुले, मुलगी, भाचा, भाच्याची मुले राजकारणात सक्रिय झाले. शेवटी दोन भावांमध्ये पक्षाची सूत्रे कोणाकडे असावीत यावरून वाद झाला. महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या घरातही राजकीय उत्तराधिकाऱ्यावरून वाद झाला. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या घरातही मुलगी आणि पुतण्या दुरावले.