सकाळी बरसणाऱ्या रिमझिम धारा अंगावर झेलत काही मंडळी मतदानासाठी उत्साहाने बाहेर पडली. यादीत नाव शोधण्यात होणारा मतदारांचा सावळागोंधळ यंदाही कायम राहिल्याने नाव शोध मोहिमेपेक्षा काहींनी घरी राहणे पसंत केले. मतदानाचा उत्साह दुपारनंतर काही केंद्रांवर वाढला, तर कुठे मावळला. मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे यासाठी राजकीय पक्षांकडून सामाजिक संस्थाच्या वतीने सायंकाळपर्यंत प्रयत्न सुरू राहिले. काही व्यावसायिकांनी मतदान करणाऱ्या मंडळींकरिता विशेष सवलती जाहीर केल्या.

विधानसभा निवडणूक मतदानासाठी प्रशासनाच्या वतीने विशेष प्रमाणावर जनजागृती करण्यात आल्याने यंदा मतदारांमध्ये रिमझिम पावसातही मतदानाचा उत्साह दिसून आला. विशेषत: युवावर्ग मतदानासाठी उत्साहाने बाहेर पडला. केंद्रांवर सकाळपासूनच कार्यकर्ते, उमेदवार यांची धावपळ सुरू होती. राजकीय पक्ष, प्रशासनाच्या काही मंडळींनी मतदार यादीत नाव शोधून देण्यासाठी केंद्राबाहेर टेबल लावले होते. काही ठिकाणी वीजपुरवठय़ाची व्यवस्था नसल्याने वायफायच्या माध्यमातून भ्रमणध्वनी अथवा लॅपटॉपच्या मदतीने मतदारांना नाव शोधून देण्यात येत होते. काही ठिकाणी मतदारांचे नाव आणि छायाचित्र मिळाले, काही ठिकाणी वय जुळले नाही अशा त्रुटी तसेच मागील निवडणुकीतील केंद्र बदलल्याने यादीत नाव शोधण्याचा काथ्याकूट करावा लागला.

या गर्दीत आपल्या उमेदवाराचा राजकीय प्रचार करण्याची संधी कार्यकर्त्यांनी सोडली नाही. कोणी उघडपणे अमुककडे लक्ष असू द्या, असे मतदारांना आवाहन करत होते. मतदान चिठ्ठी देण्याच्या बहाण्याने यंदा मत अमुकलाच, अशी हात जोडून विनंती करण्यात येत होती. मतदारही ही आर्जवे हसत स्वीकारत मतदान केंद्राकडे मार्गस्थ होत होते. केंद्राच्या बाजूला कार्यकर्त्यांचे भ्रमणध्वनी मतदानासाठी काही व्यवस्था आहे का.. मदत करत नाही मग मतदान का करू ..आमची काय व्यवस्था आहे, यासारख्या संदेशाची देवाण-घेवाण करत होते. केंद्रावरही पोलीस तसेच अन्य स्वयंसेवकांकडून मतदान खोली क्रमांकासह इतर मार्गदर्शन करण्यात येत होते.

प्रत्यक्ष केंद्रावर आपण ईव्हीएमवर केलेले मत व्हीव्हीपॅटवर दिसते की नाही हे पाहत तर बीप आवाज अजून कसा येत नाही, म्हणून काही मंडळी त्याच ठिकाणी थांबल्याने पुढील मतदारांचा खोळंबा झाला. राजकीय पक्षांकडून बूथ तसेच मतदान केंद्रावर असलेल्या कार्यकर्त्यांची सरबराई सुरू राहिली. कार्यकर्त्यांसाठी चहा, अल्पोहारासह जेवणाची व्यवस्था करण्यात आली असताना सरकारी कर्मचारी, पोलिसांना प्रशासनाकडून येणाऱ्या व्यवस्थेवर अवलंबून राहावे लागले.

सकाळी मतदारांचा असलेला उत्साह दुपारी काही अंशी मावळला. तीननंतर पुन्हा केंद्रामध्ये गर्दी दिसून आली. नवमतदार पहिल्यांदा मतदानासाठी बाहेर पडत असताना अनेकांनी मतदानपूर्व आणि मतदानानंतर असे सेल्फी समाजमाध्यमांवर टाकले. काही केंद्रांवर प्रशासनाच्या वतीने सेल्फीसाठी व्यवस्था करण्यात आली होती. हौशी मतदारांकडून या ठिकाणी आवर्जून छायाचित्र काढण्यात आले. समाजमाध्यमातून ‘व्होट कर नाशिककर’, ‘जे तुमच्यासाठी पाच वर्षांत एक मिनिटही देत नाहीत, त्यांच्यासाठी एक तास पावसात का उभे रहायचे’, ‘बोट दाखविण्यापेक्षा बोट वापरा’ असे सामाजिक संदेश फिरत राहिले. मतदारांसाठी व्यावसायिकांनी काही विशेष सवलती जाहीर केल्या होत्या. बोटावरील शाई दाखवा आणि सवलत मिळवा, असे आवाहन काही व्यावसायिकांनी केले. या आवाहनाला प्रतिसाद देत मतदारांनी खरेदी, मौजमस्तीची संधी साधली.

चिखलात मतदान केंद्र

अपंग, वृद्धांना त्रास होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने वरच्या मजल्यावरील काही मतदान केंद्र शाळा-महाविद्यालयाच्या आवारात घेण्यात आली. मतदानाच्या पूर्वसंध्येला तसेच सकाळी पाऊस झाल्याने काही केंद्राच्या आवारात पाणी साचले. नाशिक पश्चिममधील सुखदेव माध्यमिक विद्यालयाच्या आवारातील तात्पुरत्या स्वरूपातील मतदान केंद्र चिखलात होते. नेमकी उलट परिस्थिती डे केअर केंद्राची होती. या ठिकाणी सर्वत्र पेव्हर ब्लॉक आणि फरशी असल्याने पावसाचे पाणी काही अंशी साठले होते. तात्पुरत्या स्वरूपातील मतदान केंद्रातही पाणी शिरले. व्ही. एन. नाईक महाविद्यालयासमोरील मैदानाचा चिखल, गाळ थेट रस्त्यावर आल्याने हाच चिखल, गाळ मतदान केंद्रात येत राहिला.

अनेक जण मतदानापासून वंचित

शासकीय सेवेत असणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना टपालाद्वारे मत देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र त्या सेवेचा लाभ न घेता थेट मतदानासाठी आलेल्यांना प्रत्यक्ष मतदानापासून वंचित राहावे लागले. सिडको येथील पेठे शाळेत एकाच्या बाबतीत हा प्रकार घडला. तर के.टी.एच.एम. महाविद्यालयात आलेल्या एकाचे वय यादीतील वयाप्रमाणे जुळले नाही म्हणून त्यांना मतदान करता आले नाही. हिरावाडी येथे राहणारे शरद देशपांडे हे ज्येष्ठ मतदार देवधर स्कूलमध्ये मतदानासाठी सकाळीच गेले असताना त्यांच्या नावावर आधीच मतदान करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांचा आवाज मोठा झाला असता तुम्ही अर्धा एक तास बसा, आम्ही केंद्रप्रमुखांशी बोलून बघतो काय आहे ते, असे त्यांना सांगण्यात आले. परंतु, या प्रक्रियेत होणारा कालपव्यय पाहता त्यांनी थेट घरचा रस्ता धरला.