“नवनियुक्त आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामुळे देशाचे नेते असणाऱ्या शरद पवारांनी पुढाकार घेत शेतकऱ्यांच्या आणि राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्राला स्थिर सरकार द्यावे. त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा,” असं मत युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी व्यक्त केले आहे. अमरावतीमधील बडनेरा मधून निवडून आलेल्या राणा यांनी राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे नवनियुक्त आमदारांना शेतकऱ्यांसाठी काहीच करता येत नसल्याबद्दल खतं व्यक्त केली.

राज्यामध्ये शिवसेनेच्या नाकर्तेपणामुळे युतीला बहुमत असूनही राष्ट्रपती राजवट लागू झाली अशी टीका राणा यांनी केली आहे. “राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागणे अत्यंत दुर्देवी आहे. महाराष्ट्राच्या जनतेने भाजपा शिवसेनेच्या महायुतीच्या बाजूने कौल दिला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी १० ते १५ वेळा मातोश्रीवर फोन करुन, शिवसेनेची संपर्क साधून एकत्र येत सरकार बनवले पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली. राज्याला स्थिर सरकार देण्याची गरजही फडणवीस यांनी बोलून दाखवली होती. मात्र त्याला उद्धव ठाकरेंनी काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे वीस दिवसांपासून अधिक काळापासून महाराष्ट्राची जनता वाट पाहत आहे. महाराष्ट्रातील शेतकरी सत्ता स्थापनेची वाट पाहत आहे, सर्वसामान्य जनता वाट पाहत आहे. महाराष्ट्राच्या विधीमंडळात जाऊन जनतेचे अनेक प्रश्न आमदारांना सोडवायचे आहेत मात्र अद्याप त्यांच्या शपथविधीही झाला नाहीय. महाराष्ट्रातील शेतकरी ओल्या दुष्काळामध्ये अडकलाय, संकटामध्ये अडकलाय आहे. महाराष्ट्रात स्थिर सरकार आली असती, एक स्थिर मुख्यमंत्री मिळाला असता तर महाराष्ट्राचे अनेक प्रश्न सुटले असते. पण एवढे बहुमत असूनही शिवसेनेच्या नाकार्तेपणामुळे त्यांनी भाजपापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. हे महाराष्ट्राची जनता विसरणार नाही आणि ते शिवसेनेला भविष्यात नक्कीच धडा शिकवतील. मागील २० दिवसांपासून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत या मागणीसाठी आमच्यासारखे आमदार मुंबईमध्ये ठिय्या मांडून बसेल आहेत,” असं मत राणा यांनी एक खासगी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना व्यक्त केलं.

राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन करण्यासाठी तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या बैठकी आणि चर्चांचे सत्र सुरु आहे. महाराष्ट्रामध्ये मध्यवर्ती निवडणुका होणार का याबद्दल दबक्या आवाजामध्ये चर्चा सुरु झाली आहे. मात्र त्याचवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘राज्यामध्ये मध्यवर्ती निवडणुका होणार नाही तुम्ही तुमच्या कामाला लागा,’ असा आदेश राष्ट्रवादीच्या आमदारांना दिला आहे. पवारांनी व्यक्त केलेल्या या विश्वासामुळे लवकरच राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.