विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून, जिल्ह्यतील तिन्ही विधानसभा क्षेत्रांमध्ये दोन लाख ७७ हजार मतदारांना मोबाईल संदेश व ऑडिओ कॉल करून मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या टक्केवारीचा विक्रम पार होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शेखर सिंह यांनी रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. दरम्यान, गडचिरोलीत सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

शेखर सिंह यांनी सांगितले की, जिल्ह्यतील गडचिरोली, आरमोरी व अहेरी या तीन विधानसभा क्षेत्रांमध्ये सकाळी ७ ते दुपारी ३ वाजतापर्यंत मतदान होणार आहे. आरमोरी क्षेत्रात १०५, गडचिरोलीत ९० तर अहेरी क्षेत्रात २२३ मतदान पथके दाखल झाली आहेत. जिल्ह्यत आतापर्यंत ८५ लाख रुपयांची रोख  व दारू ताब्यात घेण्यात आली आहे. मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात कलम १४४ लागू करण्यात आली असून, सीमारेषेवरील पाच किलोमीटपर्यंत दारूबंदी असणार आहे. जिल्ह्यत ५० सूक्ष्म निरीक्षक नेमण्यात आले आहेत. पाच सखी मतदान केंद्र असून, ९६ ठिकाणी वेबकास्टिंग तर १०० ठिकाणी व्हिडीओ रेकॉर्डिग केली जाणार आहे. ४१२० कर्मचारी मतदान प्रक्रियेत प्रत्यक्ष कार्य करणार असून, गरोदर महिला, दिव्यांग व वृद्धांसाठी रांगेची आवश्यकता नाही, असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले. निवडणुकीच्या आधी ४८ तास ऑपिनियन पोल, एक्झिट पोल दाखवता, छापता व सामाजिक माध्यमांवर अपलोड करता येणार नाही. आचारसंहितेचा भंग होणाऱ्या चुकीच्या बातम्या, अफवा याबाबतही बातम्या प्रसिद्ध करताना किंवा पोस्ट प्रसिद्ध करताना सर्व प्रकारच्या माध्यमांनी उचित काळजी घ्यावी. यासाठी पोलीस विभागातील सायबर सेल सतत लक्ष ठेवून आहे. प्राधिकारपत्र धारण केलेल्या माध्यमांनाही मतदान केंद्राच्या आत फोटो व व्हिडीओ घेण्यास परवानगी आयोगाने नाकारली आहे. त्यांना मतदान केंद्राच्या बाहेरील फोटो व रांगांचे व्हिडीओ घेता येतील, असे शेखर सिंह यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला निवडणूक विभागाच्या उपजिल्हाधिकारी कल्पना नीळ, नायब तहसीलदार चडगुलवार उपस्थित होते.