गणपत गायकवाड यांच्या आरोपांमुळे युतीत अस्वस्थता

कल्याण पश्चिम आणि पूर्व या दोन्ही मतदारसंघांत युतीमध्ये बंडखोरी झाली असून यावरून कल्याण पूर्वेतील भाजपचे उमेदवार गणपत गायकवाड यांनी थेट पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केल्याने युतीतील तणाव वाढला आहे. शिंदे यांना शक्य असूनही कल्याण पूर्वेतील बंडखोरी त्यांनी थांबवली नाही, असा आरोप गायकवाड यांनी केला आहे. यामुळे युतीतील मनोमिलन दोन्ही पक्षांतील नेत्यांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील कल्याण पूर्व आणि पश्चिम या दोन्ही मतदारसंघांमध्ये शिवसेना-भाजप युतीमध्ये बंडखोरी झाली आहे. कल्याण पूर्वेतून युतीतर्फे भाजपचे गणपत गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली असून याठिकाणी उल्हासनगर महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक धनंजय बोडारे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून बंडखोरी केली आहे. बोराडे यांच्या निवडणूक प्रचारात कल्याण पूर्व आणि उल्हासनगर पट्टय़ातील शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी जोमाने उतरल्याचे चित्र असून अर्ज भरताना काढण्यात आलेल्या मिरवणुकीतही स्थानिक शिवसैनिकांनी केलेले शक्तिप्रदर्शन गायकवाड यांच्या जिव्हारी लागले आहे. कल्याण पश्चिम मतदारसंघ युतीच्या जागा वाटपामध्ये शिवसेनेकडे गेला असून या मतदारसंघातून शिवसेनेने विश्वनाथ भोईर यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या दोन्ही मतदारसंघांतील बंडखोरी रोखण्यात युतीच्या नेत्यांना अपयश आले असतानाच बंडखोरीच्या मुद्दय़ावरून कल्याण पूर्वेतील भाजपचे उमेदवार गणपत गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना थेट पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले आहे.

शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता

शिवसेनेने नेहमीच ठाणे जिल्ह्य़ात भाजपला अशाच प्रकारे संपविण्याचे काम केले आहे, असा आरोप गणपत गायकवाड यांनी केला. तसेच  मातोश्रीवरून आदेश आला होता तर मग दुसरा आदेश ठाणे जिल्ह्य़ातून निघाला आणि त्या आदेशानुसार बंडखोरी झाली, असा दावाही त्यांनी केला. तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी रोखण्यासाठी पुढाकार घेतला नसल्याचा आरोपही त्यांनी केला. यामुळे युतीमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. त्यांनी  केलेल्या आरोपामुळे शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.