|| जयेश शिरसाट

शिवाजीनगर-मानखुर्दमध्ये टोळीयुद्धाच्या ठिणग्या:- पोटापाण्यासाठी राज्य-परराज्यांमधून मुंबईत आलेल्या लोंढय़ातली बरीचशी गर्दी गोवंडी, शिवाजीनगर-मानखुर्दमध्ये विसावते. इथल्या झोपडीदादांच्या टोळ्यांनी खाडी बुजवून उभ्या केलेल्या खोपटय़ांमध्ये या गर्दीला हक्काचा निवारा मिळतो. तो एकदा मिळाला की आयुष्यभर ही उपरी गर्दी विविध सुविधा बेकायदा पुरवणाऱ्या टोळ्यांवर अवलंबून आयुष्य जगते. पाण्यापासून वीज आणि बांधकामापासून पार्किंगपर्यंत टप्प्याटप्प्यावर आवश्यक असलेल्या प्रत्येक सोयी-सुविधा पुरवणाऱ्या टोळ्यांचा संचार या भागात आहे. त्यामुळेच येथील वस्ती बकाल होत असून वर्चस्वातून टोळीयुद्धाच्या ठिणग्या कायम उडत असतात. त्यात सर्वसामान्य नागरिक मात्र होरपळून निघतात.

जिजाबाई भोसले मार्ग तथा घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्याशेजारी वसलेल्या रफीकनगर ते मानखुर्द चौकापर्यंतच्या झोपडपट्टीत मुस्लीमधर्मीय मोठय़ा संख्येने राहतात. या लोकवस्तीत उत्तर भारतातून पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्यांची संख्या जास्त आहे. मागच्या बाजूला खाडी आणि खाडीपलीकडे देवनार कचराभूमी. पूर्वी या खाडीतून मोठी गलबते अधून-मधून येत. सध्या खाडीचे रूपांतर नाल्यात झाले आहे. खाडीपात्र इतके आक्रसले आहे की, या वस्तीतील लहान मुले टायर टय़ूब फुगवून त्याआधारे पलिकडील कचराभूमीवर खेळण्यासाठी जातात. अनेक वर्षांपासून येथील झोपडीदादा अविरतपणे खाडी बुजवून झोपडय़ा उभारत आहेत. सुरुवातीला पत्र्याच्या भिंती करून उभारलेल्या या तात्पुरत्या झोपडय़ा हळूहळू भक्कम घरात रूपांतरित होतात. टप्प्याटप्प्याने त्यावर मजले चढतात.

झोपडी विकत घेणाऱ्याला लगेचच नळजोडणी, विजेची व्यवस्था उपलब्ध होत नाही. तेव्हा त्यांच्या मदतीला येथील संघटित टोळ्या धावून येतात. एक टोळी चोरलेल्या विजेची जोडणी झोपडीत देते, तर दुसरी टोळी पाणी पुरवते. विजेचे महिन्याकाठी घरटी तीनशे रुपये वसूल केले जातात. या टोळ्या वीज वापरावर मात्र बंधन घालत नाहीत. काही वर्षांनी या झोपडीत राहाणारे कुटुंब याच टोळ्यांना हाताशी धरून शिधापत्रिका, आधार कार्ड आदी कागदपत्रे तयार करून घेते. विजेची अधिकृत जोडणी, पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांची जोडणी आपोआप घरापाशी येऊन ठेपते. मात्र तरीही विजेची अवैध जोडणी कायम राहते. वैध वीज जोडणीचा वापर मर्यादित ठेवून अवैध जोडणीचा वापर हवा तितका करायचा, हे येथील सूत्र बनले आहे.

या वस्तीत तीन ते चार हजारांहून अधिक छोटे-मोठे उद्योग आहेत. पूर्वी येथे जरी-काम कारखान्यांचे प्रस्थ होते. आता जरी कारखाने कमी होऊन चप्पल-बूट तयार करणारे, बक्कल कारखाने, गार्मेंट व्यवसाय मोठय़ा संख्येने आणि अन्य उद्योग सुरू असतात. या छोटय़ा-मोठय़ा उद्योगांनाही चोरलेली वीज वापरली जाते. वीज चोरांच्या टोळ्यांविरोधात येथील पोलिसांनी मोक्कान्वये कठोर कारवाईही केली. मात्र टोळ्यांचा सुळसुळाट कमी झालेला नाही. वीज, पाण्यासोबत बांधकामासाठीही इथल्याच टोळ्यांना कंत्राट द्यावे लागते. सध्या येथे वांद्य््रााच्या गरीबनगरप्रमाणे झोपडय़ांवर तीन ते चार मजली इमारती उभ्या राहिलेल्या दिसतात.

बेकायदा वीज, पाणीपुरवठा

लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांनी भांडून येथील पाण्याची समस्या सोडवली आहे. त्यामुळे आता वस्तीतल्या बहुतांश घरांमध्ये महापालिकेच्या अधिकृत जोडण्यांमधून पुरेसे पाणी येते. मात्र अवैध उभ्या राहणाऱ्या वस्त्यांना मात्र याच टोळ्या पाणी पुरवतात. वीज चोरांमुळे अधिकृत जोडणी असलेल्या घरांमध्ये वापराच्या मानाने बिल जास्त येते. चोरांनी मधल्यामध्ये चोरलेल्या विजेचे पैसे पुरवठादार कंपनी सर्वसामान्य ग्राहकांकडून वसूल करते, अशी भावना येथील वस्तीत आहे. कचराभूमीवरीच कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्याही टोळ्या येथे आढळतात. प्रत्येक टोळीप्रमुखाकडे कचरा वेचकांची टोळी आणि आखून दिलेली हद्द असते. या हद्दीच्या वादातून टोळीयुद्ध भडकते. विजेची जोडणी, पाण्याची लाइन कापली जाते. प्रसंगी दहशत निर्माण करण्यासाठी रहिवाशांवरच चाकू-सुरे चालवले जातात.

या अडचणी किंवा समस्या वर्षांनुवष्रे जशास तशा आहेत. एकाही लोकप्रतिनिधीने या संघटित टोळ्यांना वेसण घालण्यासाठी ठोस उपाययोजना किंवा हालचाली केलेल्या नाहीत. त्यामुळे हीच व्यवस्था येथील जनतेच्या अंगवळणी पडलेली दिसते.

रस्ते अपुरे

येथे लोकसंख्येच्या मानाने रस्ते अपुरे पडत आहेत. आहेत त्या रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी दुहेरी पार्किंग आढळते. उरलेल्या रस्त्यांवरून बेस्ट बस, मालवाहू ट्रक, रिक्षा, अन्य खासगी वाहने ये-जा करत असल्याने दिवसाच्या कोणत्याही प्रहरी येथे वाहतूक कोंडी असते. शिवाजीनगर बस आगार ते शिवाजी नगर चौक हे एक ते दीड किलोमीटर अंतर कापण्यासाठी अनेकदा अर्धा ते पाऊण तास लागतो. येथे पार्किंगच्याही टोळ्या आहेत. प्रत्येक टोळीने आपापली हद्द विभागून, आखून घेतलेली आढळते. हद्दीत पार्किंगचे पैसेही टोळ्या वसूल करतात.