ज्यांना या विधानसभेसाठीचं तिकिट मिळालं नाही त्यांची माफी मागतो असं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तुम्ही सगळे माझे सैनिक आहात. माझे साथी सोबती आहात. मी माँ आणि बाळासाहेबांचा पुत्र आहे म्हणून मला हे भाग्य लाभलं आहे. तिकिट मिळालं नसेल तर नाराज होऊ नका ज्यांना तिकिट मिळालं नाही अशा सगळ्यांची माफी मागतो असं म्हणत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणाचा समारोप केला. असं म्हणतात की वादळ असलं की सगळा पालापाचोळा उडून जातो. मला वादळामध्ये हे भगवं वादळ काय असतं हे दाखवून द्यायचं आहे असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

आपल्या सुमारे 35 ते 40 मिनिटांच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर, कलम 370 यांसह विविध मुद्द्यांना हात घातला. तसेच सत्तेत होतो आणि सत्तेत राहणार असा विश्वासही व्यक्त केला. राम मंदिराचा आग्रह आम्ही कधीही सोडणार नाही. सुप्रीम कोर्टाने राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला तर ठीक नाहीतर विशेष कायदा करुन राम मंदिराची निर्मिती करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारकडे केली. एवढंच नाही तर 1 रुपयात झुणका भाकर योजनेप्रमाणे 10 रुपयांमध्ये चांगल्या दर्जाचं जेवण देण्याचीही घोषणा केली.

यावेळी आपण भाजपासोबत युती का केली हेदेखील उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. भाजपासोबत युती केली कारण ही युती स्वार्थासाठी झालेली नाही. ही महाराष्ट्रानं स्वीकारलेली युती आहे. तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना अशी अवस्था जरुर झाली होती मात्र महाराष्ट्राच्या जनतेसाठी आम्ही पुन्हा एकत्र आलो आहोत असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. तसंच पुन्हा एकदा विधानसभेवर भगवा फडकवू असं आवाहनही केलं