मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज त्यांच्या भाषणातून एक इच्छा व्यक्त केली आहे. ती इच्छा म्हणजे पहिल्यादांच एका राजकीय पक्षाने केलेली मागणी केलेली आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणातून मला प्रबळ विरोधी पक्ष व्हायचं आहे अशी मागणी केली. ही मागणी आजवर कुणीही केली नाही. तुमचे प्रश्न मांडण्यासाठी मला प्रबळ विरोधी पक्ष बनवा अशी मागणी राज ठाकरेंनी केली. राज्याला सध्या मजबूत आणि सक्षम विरोधी पक्ष आणावा याची गरज आहे. सरकारला जाब विचारणारा विरोधी पक्ष हवा आहे असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

सांताक्रुझ या ठिकाणी राज ठाकरेंची विधानसभा निवडणुकीसाठीची पहिली सभा रंगली होती. अवघ्या १० ते १५ मिनिटात राज ठाकरे यांनी भाषण आटोपतं घेतलं. आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी खड्डे, खड्ड्यांमुळे शहरांची होणारी दुरवस्था या सगळ्याबाबत भाष्य केलं. विशेष बाब म्हणजे त्यांनी प्रशासन, सत्ताधारी असा काहीही उल्लेख केला नाही. राज ठाकरे आज ईडीवर बोलणार का? भाजपावर बोलणार का? शिवसेनेवर टीका करणार का? हे आणि असे सगळेच प्रश्न महाराष्ट्राला पडले होते. मात्र कोणत्याही गोष्टीवर भाष्य न करता अवघ्या १५ मिनिटात राज ठाकरेंनी त्यांचं भाषण आटोपतं घेतलं.

इतके दिवस महाराष्ट्राची सत्ता एकदा हाती द्या मी तुम्हाला हा महाराष्ट्र सुतासारखा सरळ करुन दाखवेन अशी मागणी करणारे राज ठाकरे आज बॅकफूटवर गेल्याचं दिसून आलं. कारण माझ्या हाती विरोधी पक्षाची धुरा द्या अशी जाहीर मागणी त्यांनी सांताक्रूझ या ठिकाणी झालेल्या सभेत केली. राज्यात एक सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. जर विरोधी पक्ष सक्षम असेल तर तो जनतेचे प्रश्न सत्ताधाऱ्यांपुढे मांडू शकतो. माझा आवाका मला ठाऊक आहे त्यामुळे मला सक्षम विरोधी पक्ष बनवा अशी मागणी राज ठाकरेंनी केली. इतकंच नाही तर जेव्हा सत्ता मागायची वेळ येईल तेव्हा मी सत्ताही मागेन असंही ते म्हणाले. मात्र आता त्यांनी केलेली मागणी आणि त्यांनी आटोपतं घेतलेलं भाषण यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. राज ठाकरे बॅकफूटवर गेले आहेत का? ही त्या चर्चांपैकी होणारी एक प्रमुख चर्चा आहे.