मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर फडणवीस सरकारने मंगळवारी राजीनामा दिला आणि राज्यात महिन्याभरापासून सुरु असणारा सत्तापेच सुटला. आज सकाळी आठ वाजताच महाराष्ट्राच्या विधीमंडळामध्ये आमदारांच्या शपथविधी कार्यक्रमाला सुरुवात झाली. या शपथविधीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक ऐतिहासिक क्षण पहायला मिळाले. याच क्षणांपैकी एक खास क्षण ठरला तो पहिल्यांदाच आमदार झालेल्या रोहित पवार यांनी घेतलेली शपथ.

कर्जत-जामखेड मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार असणाऱ्या रोहित पवार यांनी आमदारकीची शपथ घेताना आपले वेगळेपण दाखवून दिले. एकीकडे सर्व आमदारांनी आपले संपूर्ण नाव घेत शपथ घेतली. मात्र रोहित पवार यांनी शपथ घेण्यास सुरुवात करताना आवर्जून आपल्या आईचे नावही घेतले. “मी रोहित सुनंदा राजेंद्र पवार शपथ घेतो की…” अशी सुरुवात रोहित यांनी आमदारकीची शपथ घेताना केली. रोहित हे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याचे नातू आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये रोहित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निटकटवर्तीय राम शिंदे यांचा पराभव करत विधानसभेची निवडणूक जिंकली. ४३ हजार ३४७ मताधिक्याने रोहित निवडून आले आहेत.

शपथविधी सोहळ्यासाठी विधिमंडळामध्ये जाण्याआधी रोहित यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “आम्हाला अजित पवार परततील याचा विश्वास होता. जे काही घडलं ते कशामुळे घडलं, का घडलं हे माहित नाही. अजित पवार आमचेच आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. ते परत येतील याचा विश्वास होता. कुटुंबाचे आहेत म्हणून ते परतल्याचा आनंद झाला त्यापेक्षा अधिक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून आनंद झाला. भाजपाला विकासाची निती दिसत नाही. फोडाफोडी करण्याची त्यांची पद्धत आहे. आमच्या कुटुंबातही तसंच काहीसं करण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण तो फसला,” अशी प्रतिक्रिया रोहित यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना नोंदवली.

पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडूण आल्यानंतर विधिमंडळामध्ये शपथविधीसाठी जाणाऱ्या रोहित यांचे स्वागत त्यांची आत्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

ट्विटवरुन रोहित यांनी तरुण नेत्यांना मंत्रीमंडळामध्ये महत्वाची जबाबदारी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. “मला अपेक्षा आहे की येणाऱ्या काळात राज्यकारभार करताना महाविकासआघाडी मार्फत तरुणांना देखील महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जातील. राज्यातील प्रश्न सोडवण्यासंबधित जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करता येईल,” असं ट्विट रोहित यांनी केलं आहे.